हिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 5 लाख कोटीपर्यंत ( 5 ट्रिलिअन डॉलर) पोहोचवण्याचे ध्येय मोठे आव्हान आहे. मात्र, हे ध्येय सर्वांच्या सहकार्याने गाठणे शक्य असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ध्येय गाठण्यासाठी राज्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निती आयोगाच्या शनिवारी झालेल्या पाचव्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीला देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बैठकीला अनुपस्थित होते.

आगामी काळात सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात निती आयोग महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर देशाच्या विकासासाठी आता प्रत्येकाने काम करण्याची वेळ आली आहे. देशातील गरीबी, बेरोजगारी, दुष्काळ, अन्न, प्रदुषण, भ्रष्टाचार आणि हिंसाचार या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 5 लाख कोटी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. हे मोठे आव्हान आहे. मात्र, सर्वांच्या सहकार्याने ते गाठता येऊ शकते. यासाठी राज्यांनी त्यांची क्षमता ओळखून जिल्हा स्तरावर काम करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या बहुतांश भागात सध्या दुष्काळसदृश्य स्थिती आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ ही नीती अवलंबायला हवी, असेही ते म्हणाले. नव्याने तयार करण्यात आलेले जलशक्ती मंत्रालय पाण्याबाबत एकात्मिक दृष्टीकोन राखण्यात तसेच राज्यांकडून एकत्रितपणे पाण्याचे संवर्धन आणि नियोजन करण्यासाठी मदत करेल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.