अरबाजसोबत वाजल्यानंतर मलायका पहिल्यांदा बोलली, म्हणाली आमच्यामुळे …

988

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील सर्वात आदर्श जोडी म्हणून पाहिले जात असलेल्या अरबाज खान आणि मलायका अरोडा यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला असला तरी संबंध एकदम तुटले नव्हते. अनेकवेळा विविध सण आणि इतर कार्यक्रमांमध्ये मलायका सलमानच्या घरीही दिसली होती. दोघांमध्ये वाजल्यानंतर आता पहिल्यांदाच मलायका त्याबाबत खुलेपणाने बोलली आहे.

करीना कपूरच्या रेडिओ शोमध्ये नुकतीच मलायका अरोडाने हजेरी लावली. यावेळी तिने अरबाजसोबत झालेला घटस्फोट आणि दोघांमधील नात्यांवर खुल्या दिलाने भावना मांडल्या. ‘आमच्या दोघातील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे इतर लोकांना त्रास होत होता. आमच्या दोघांमुळे इतरांच्या आयुष्यावर परिणाम झाला होता. घटस्फोट घेण्याआधीच्या रात्री संपूर्ण कुटुंबासोबत बसून चर्चा केली. मी मला स्वत:ला देखील प्रश्न विचारला की 100 टक्के घटस्फोट घेऊ इच्छिते ना? आणि यानंतरही मी तो निर्णय घेतला’, असे मलायका म्हणाली.

मलायका पुढे म्हणाली की, ‘घटस्फोट घेण्याचा हा निर्णय सोपा नव्हता. अशा वेळी पार्टनर एकमेकांवर आरोप ठेऊन खापर फोडण्याचे काम करत असतात. माझ्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा होता, कारण माझ्यासाठी माझा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. आम्ही दोघांनी यावर मोठी चर्चा केली आणि त्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.’

दरम्यान, सध्या मलायका अरोडा ही अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्रही पाहिले गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या