शांतिदूत

625

अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

मलाला युसुफजाई. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे निवडली गेलेली सर्वात लहान शांतिदूत… याहीपेक्षा आपल्याच देशातील अन्यायग्रस्त परिस्थितीविरुद्ध उभी ठाकणारी ती एकली एकमेव आहे.

सामान्य घरात जन्मलेली ती असामान्य आहे. जगाला हादरवणारा दहशतवाद जिथं थैमान घालत असतो, तिथंच तिचं जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचं स्वप्न फुललं आहे. दहशतवादी हल्ल्यामुळेच मरणाला स्पर्शूनही, तिच्यातल्या जिद्दीला सलाम करत साक्षात मृत्यूनं तिला जीवदान दिलं आहे. ज्यांच्यामुळे या जगाचा निरोप घेण्याची वेळ आली होती, त्या दहशतवाद्यांबद्दल रागाचा, संतापाचा लवलेशही मनात न ठेवता ती स्वतःच्या कार्यात मग्न आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघानं तिची अवघ्या १९ व्या वर्षी ‘शांतीदूत’ म्हणून निवड केली आहे… ती आहे मलाला युसूफजाई..

स्वात व्हॅली, या पाकिस्तानातल्या एका निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भागात, झऱयांच्या खळखळत्या प्रवाहांबरोबर हसत खेळत जगणाऱया १० वर्षाच्या मलाला युसूफजाईच्या आयुष्यात तालिबानी आक्रमणामुळे प्रचंड उलथापालथ झाली. होत्याचं नव्हतं झालं. मानवतेला काळिमा फासणाऱया त्यांच्या अतिरेकी क्रौर्यानं स्वात व्हॅलीतही उच्छाद मांडला होता. स्त्रियांना तुच्छ मानणाऱया आणि जगण्याच्या साऱया शक्यतांनाच आपल्या दहशतीच्या टाचेखाली क्रूरपणे चिरडणाऱया तालिबानी कृत्यांचे व्हिडीओज आजही सगळं जग पहातं. त्याबद्दल हळहळ व्यक्त करतं. आपण तिथे नाही, याबद्दल सुटकेचा निःश्वास टाकतं. पण अशावेळी मलाला युसूफजाई कोवळा पण कणखर सूर त्या अन्यायाविरोधात काढते. शिक्षणापासून वंचित करणाऱया तालिबानी निर्णयाला जाब विचारते. आपल्याविरोधी असण्याच्या नुसत्या संशयावरून लोकांचे गळे जाहीरपणे चिरणारे, स्त्रियांना आसूडानं फटके मारणारे तालिबानी, आपल्या हिंसेची दहशत जनमानसावर बसवून, त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करत असताना, ‘मुलींना, स्त्रियांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही’, असं म्हणत वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी भाषण देते, लिहिते, हिंसेला अहिंसेनं, शास्त्राला विचारानं उत्तर द्यायला उभी राहते.

‘बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा पुस्तकांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कारण बदलाचं सर्वात मोठं अस्त्र बंदूक नसून पुस्तक आहे’ हे मलालाचं म्हणणं. ती आणि तिचे कुटुंबीय यांना आजही तालिबानींपासून धोका आहे. पण ती म्हणते, ‘तालिबानी समोर आले तर त्यांनाही मी हेच सांगेन की, शिक्षणाची गरज सगळ्यांना आहे. अगदी तुमच्या मुलांनाही…’ शिक्षणापासून वंचित अशा जगातल्या सर्व मुलांसाठी, शांत पण ठाम सुरात बोलणारी मलाला. ‘एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक लेखणी जग बदलू शकते’ यावर विश्वास असणारी मलाला. जेव्हा जग गप्प बसून बघ्याची भूमिका घेतं, तेव्हा अन्याविरुद्धचा एक आवाजसुद्धा न्याय मिळवायला समर्थ असतो, हे निर्भयतेनं सांगणारी आणि तसंच वागणारी मलाला युसूफजाई…

आपण कधी ऐकणार आपला आतला आवाज? आणि कधी प्रामाणिक धैर्यानं त्या आवाजाला देणार आहोत प्रतिसाद? जागतिक भ्रष्टाचार, दहशतवाद यांना आपल्या गप्प बसण्यानं, आपण नकळत देत आलो आहोत प्रोत्साहन.. माणुसकीला जाग आणण्यासाठी आपण का नाही होऊ शकत मलाला, माणुसकीच्या नात्यानं..?

मृत्यूला स्पर्शून परतली

१७ व्या वर्षी तिला नोबेल प्राईज मिळालं आणि आता ‘शांतीदूत’ म्हणून तिची निवड झाली ती वयाच्या १९ व्या वर्षी. तालिबानींनी मुलींच्या शाळाबंदीचा फतवा काढला, तेव्हा तिच्या खूप शिकण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला गेला. पण त्या सुरुंगावरच उभं राहून तिनं वयाच्या ११व्या वर्षी भाषण दिलं. ‘शिक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.’ या तिच्या वक्तव्यामुळं आणि तिनं तालिबानी दहशतीला जगासमोर आणण्यासाठी सातत्यानं केलेल्या लिखाणामुळं, तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. थेट डोक्यात.. ती वाचण्याची सुतराम शक्यताच नव्हती. अनेक शस्त्रक्रियांनंतर ती वाचली ती किमयाच होती. ती त्यानंतर बोलू शकली, पूर्ववत उभी राहू शकली, चालू शकली हीदेखील किमयाच आहे. मृत्यूला स्पर्शून परतलेली मलाला या घटनेनंतर जगण्याचं मोल तीव्रतेनं कळलेली व्यक्तिरेखा बनली. मिळालेल्या जीवनाचा संपूर्ण सदुपयोग करण्याच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहण्याची ती पराकाष्ठा करते आहे. तिच्यातल्या आवाजाची ताकद तिला गप्प बसण्याची सक्ती झाली तेव्हा कळली.

तथाकथित सज्ञानांनाही धडा

‘माझ्यापुढे दोन पर्याय होते… एक म्हणजे सहन करत मरण्याचा आणि अन्यायाविरोधात उभं राहून मरण्याचा… मी दुसरा मार्ग स्वीकारला’ हे नोबेल प्राईज स्वीकारताना तिनं उच्चारलेले शब्द. ‘तुला काय कळतंय? १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क मिळेपर्यंत तू कायदेशीररित्या अज्ञानीच…’ अशी भावना ठेवून वागणाऱया समस्त तथाकथित सज्ञानांनीही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. विचारांची प्रगल्भता केवळ वयावर अवलंबून नसते, हेच मलालानं सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांना जाब विचारण्याचा मार्ग तिच्या घरच्यांनी तिला अवलंबू दिला. भयाचा बागुलबुवा तिच्या मनात पेरला नाही. त्यांनी न्यायाची कास सोडली नाही, ही बाब मनामनात अधोरेखित झाली पाहिजे.

 

आपली प्रतिक्रिया द्या