बंदरातील गाळामुळे प्रवासी बोटसेवेस मालवण थांबा मिळण्यास अडचणी

42

सामना ऑनलाईन । मालवण
तब्बल ४४ वर्षांनी मुंबई-गोवा मार्गावर येत्या आँक्टोबरपासून पुन्हा एकदा प्रवासी बोटसेवा सुरु करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र मालवण बंदर हे गाळाने भरल्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मध्यवर्ती बंदर व पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण बंदरात प्रवासी बोट सेवेस थांबा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मालवण बंदर हे गाळाने भरले आहे. तर बंदराच्या प्रवेश मार्गावरील खडकांमुळे मच्छीमारी नौका फुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या बंदरात कँटमरान प्रवासी बोटसेवा आणण्यासाठी बंदरातील गाळ काढणे व खडक फोडणे ही प्रक्रिया आवश्यक आहे. त्यामुळे मालवण बंदरास पर्याय असलेल्या सर्जेकोट मासेमारी बंदरात प्रवासी बोटसेवेस तात्पुरता थांबा मिळावा, असा प्रस्ताव बोटसेवा सुरु करणाऱ्या राज लाँजीस्टीक या कंपनीच्या वतीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.

कोकणकिनारपट्टटीवर जलवाहतुकीने पर्यटन व बंदराचा व्यवसायीक विकास यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात येथे सोमवारी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पत्तन अधिकारी, तहसीलदार-वेंगुर्ला, मालवण, देवगड व प्रकल्प अधीकारी सिंधुदुर्ग एमटीडीसी यांच्यासह राज लाँजीस्टीकचे रझाक राजपूरकर व सी ईगल व्हेंचरच्या सिद्धार्थ नेवाळकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थीत होते अशी माहिती आनंद हुले यांनी दिली.

राज लाँजीस्टीकचे रझाक राजपूरकर व सी ईगल व्हेंचरच्या सिद्धार्थ नेवाळकर यांनी बंदरातील गाळ काढण्याची कार्यवाही व बंदरातील प्रवासी टर्मीनमधील सोयीबाबत अधिक अपेक्षा व्यक्त केल्या. सद्यपरीस्थितीत रत्नागिरी, विजयदुर्ग व देवगड बंदरात कँटमरान प्रवासी बोटसेवा थांबू शकते. मात्र मालवण, वेगुर्ला हि बंदरे गाळाने भरलेली आहेत. काही ठिकाणी खडकांमुळे मच्छीमारी नौका फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. मालवण बंदरात कँटमरान प्रवासी बोटसेवा आणण्यासाठी बंदरातील गाळ काढणे व खडक फोडणे आवश्यक आहे. तरी बोटसेवा सुरु व्हायच्या सुरवातीच्या कालखंडात मालवणऐवजी सर्जेकोट मच्छीमार बंदरात तात्पुरती सोय करणे व वेगुर्ला बंदर गाळाने भरु नये म्हणून मांडवी खाडीत बंधारा घालणे आवश्यक आहे. अशी सूचना आनंद हुले यांनी बैठकीत केली. मात्र सर्जेकोट बंदर मत्स्य विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांची परवानगी महत्वाची ठरणार आहे.

समुद्रातील तरंगता पंचतारांकीत महाल

प्रवासी बोटसेवेचे पुढचे पाऊल म्हणुन स्टार क्रुझ या जागतीक दर्जाच्या पर्यटन क्रुझ कंपनीच्या तोडीची पर्यटक बोटसेवा-क्रुझसेवा ही पश्चीम किनारपट्टटीवर सी ईगल व्हेंचरया कंपनीतर्फे सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सी ईगल व्हेंचरच्या सिद्धार्थ नेवाळकर यांनी माहिती देताना सांगीतले की हि क्रुझ म्हणजे अरबी समुद्रातील एक तरंगता पंचतारांकीत ७ मजली भव्य महाल आहे. ५०० पर्यटकांची रहाण्याची सोय असणार्या या क्रुझवर २ अलीशान स्विमींग पूल, २ जागतीक दर्जाची रेस्टाँरंट, स्पा, जीम,डिस्कोथेक, पंचतारांकीत सूट, काँन्फरंस हाँल, काँर्पोरेट मिटींग रूम अशा जागतीक दर्जाच्या पर्यटक सुवीधा आहेत. याच्या जोडीला सिंधुदुर्गातील अधिक पर्यटन विकास व्हावा या हेतूने मालवण पासुन १०० कि. मी. आत समुद्रात आंग्रीया बँक क्षेत्र आहे. येथील प्रवाळ बेटे विकसीत करण्यासाठी मच्छिमार युवकांना स्कुबा डायवींग व स्नॉर्केलींग वॉटर स्पोर्टचे प्रशिक्षण देउन त्यांना परवाने वितरीत करण्यात यावे. अंदमान, लक्षद्वीप व थायलंडपेक्षाही समृध्द आहेत.आंग्रीया बँक येथील प्रवाळ बेटे पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मालवण बंदरातील माहिती ३० दिवसात द्या
मालवण बंदरातील गाळ व खडकाळ भागाची माहिती ३० दिवसात देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी मुख्य बंदर अधिकारी मेरिटाईम बोर्ड वेंगुर्ला सिंधुदुर्ग यांनादिल्या आहेत. त्यानुसार बंदर विभागाच्या समुद्री नकाशे व अन्य माहिती तयार करणाऱ्या सलग्न विभागाकडून बंदरातील गाळ व खडकांची माहिती मिळणार आहे. तर कर्ली खाडीत वालावलपर्यंत जलवहातूक शक्य आहे. मात्र नेरूरपार पूलाखालील बाजुस लोखंडी सळ्या आहेत. त्या काढण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबत कार्यवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या