झाकीर नाईक मलेशियासाठीही बनला डोकेदुखी

705

मलेशियात चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्यावर मलेशियन सरकारने सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यावर बंदी घातली आहे. मनी लॉण्डरिंग आणि इतर प्रकरणात हिंदुस्थानला हवा असलेला झाकीर सध्या मलेशियात आश्रयाला आहे. झाकीरचे प्रत्यार्पण करावे, यासाठी हिंदुस्थानने प्रयत्न केले होते. मात्र, मलेशियाने त्याला अजूनही दाद दिलेली नाही.

या आधी मलेशियन सरकारने झाकीरची दोन वेळा चौकशी केली आहे. मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महाथीर यांनी त्याला उघडपणे पाठिंबा देत आश्रय दिला आहे. मात्र, आता तोच झाकीर मलेशियासाठीही डोकेदुखी बनला आहे.

10 तास चौकशी
राष्ट्रीय सुरक्षेला लक्षात घेऊन झाकीर नाईकवर सार्वजनिक ठिकाणी भाषण करायला बंदी घातल्याचे रॉयल मलेशियन पोलिसांनी सांगितले आहे. मलेशियन हिंदू आणि चिनी नागरिकांविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी झाकीरची काल 10 तास चौकशी केली.

मलेशियन हिंदू आणि चिनींविरोधात चिथावणी
झाकीर नाईक याने 16 ऑगस्टला केलेल्या भाषणात त्याने मलेशियातील हिंदू आणि चिनी नागरिकांविरोधात चिथावणीखोर भाषण केले. चिनी नागरिक हे मलेशियात पाहुणे आहेत त्यांनी पुन्हा चीनमध्ये परत जावे तर हिंदुस्थानातील हिंदूंपेक्षा जास्त अधिकार मलेशियन हिंदूंना आहेत. त्यांची इथे चैन सुरू आहे, असे म्हटले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाकीर याच्यावर कारवाई करत त्याला हिंदुस्थानकडे सोपवावे, अशी एकमुखी मागणी केली होती.

मला माफ करा – झाकीर
हिंदू आणि चिनी नागरिकांबद्दल दिलेल्या चिथावणीखोर भाषणावरून झाकीर नाईकने अखेर माफी मागितली आहे. ‘भाषणातील काही वाक्ये संदर्भातून वगळून त्यातून पाहिजे तो अर्थ काढण्यात आला आहे. मी जाणूनबुजून कोणत्याही व्यक्ती अथवा समाजाला दुखावलेले नाही. माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, मला माफ करा,’ असे सांगत झाकीर नाईक याने माफी मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या