मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

‘मलेशिया मास्टर्स’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या शटल क्विन पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या झांग यी मॅनवर 21-16, 13-21, 22-20 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र, दुसरीकडे पुरुष एकेरीमध्ये किदाम्बी श्रीकांत याचा प्रवास संपुष्टात आला असून, त्याला इंडोनेशियाच्या ख्रिश्चन अदिनाटाकडून पराभव पत्करावा लागला आहे.

मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूची गाठ झांग यी मॅनबरोबर पडली होती. अत्यंत अटीतटीच्या या लढतीमध्ये सिंधूने अनुभवाच्या जोरावर झांग हिचा पराभव करत उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात झांगने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये तिने 5-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरापूर्वी सिंधूने जोरदार पुनरागमन करत 11-10 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. दुसऱया गेममध्ये झांगने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत 10-3 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी सिंधूला शेवटपर्यंत मोडीत काढता आली नाही. झांगने केलेल्या झंझावाती खेळाच्या जोरावर तिने हा सेट 21-13 अशा खिशात घातला. शेवटच्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने सावध खेळ करून आपल्या अनुभवाचा प्रत्यय दिला. या निर्णायक गेममध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने पूर्ण वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, झांगने तिला कडवी झुंज दिली. सिंधूने तिच्या अनुभवाचा फायदा घेत हा गेम 22-20 असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. दरम्यान, पुरुष एकेरी प्रकारात श्रीकांतला इंडोनेशियाच्या ख्रिश्चन अदिनाटाकडून 21-16, 16-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.