सिंधू, श्रीकांत, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य सेन पराभूत

पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय या हिंदुस्थानच्या स्टार खेळाडूंनी आपापल्या लौकिकास साजेसा खेळ करीत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र झुंजार वृत्तीच्या लक्ष्य सेनला चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

सहाव्या मानांकित पी. व्ही. सिंधूने जपानच्या आया ओहोरी हिचा 21-16, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूने या उपउपांत्यपूर्व लढतीत केवळ 40 मिनिटांत बाजी मारली. आता उपांत्यपूर्व लढतीत सिंधूपुढे यी मॅन झांग हिचे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत नवव्या मानांकित एच. एस. प्रणॉयने चीनच्या शी फेंग ली याचा 13-21, 21-16, 21-11 असा पराभव करत आगेकूच केली. पहिला गेम गमावल्यानंतरही त्याने एक तास 10 मिनिटांत ही लढत जिंकली. प्रणॉयची गाठ आता जपानच्या पेंटा निशिमोटो याच्याशी पडेल. याच निशिमोटोने गतवर्षी जपान ओपन व या वर्षी स्पेन मास्टर्सचा किताब पटकावला होता. दुसऱया उपउपांत्यपूर्व लढतीत किदाम्बी श्रीकांतने आठव्या मानांकित थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्नचा चुरशीच्या लढतीत 21-19, 21-19 असा पराभव केला. आता त्याची गाठ इंडोनेशियाच्या ख्रिश्चियन एडिनाटा याच्याशी पडेल, मात्र हिंदुस्थानचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला हाँगकाँगच्या एंगस एनजी का लोंग याच्याविरुद्ध 14-21, 19-21 अशी हार पत्करावी लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.