मालदीवमध्ये तैनात असलेले हिंदुस्थानचे 70 सैनिक माघारी घेण्याचे औपचारिक निर्देश नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी दिले आहेत. मालदीवचे आठवे अध्यक्ष म्हणून झालेल्या त्यांच्या शपथविधीला भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. मात्र शनिवारी रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीत मुइझ्झू यांनी लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिल्याचे मानले जात आहे.
चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न
मात्र या सैनिकांना परत बोलाविण्याबाबत ‘चर्चेतून तोडगा’ काढण्याचे ठरल्याचा दावा परराष्ट्र अधिकाऱयांनी केला आहे. हे सैनिक मालेत उपयुक्त जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल मुइझ्झू यांनी समाधान व्यक्त केल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे.
मुइझ्झूंचे चीनच्या गळ्यात गळे
मालदीवचे नजरपैदेतील माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे मुइझ्झू हे विश्वासू सहकारी आहेत. यामीन यांनीच 2013 ते 2018 या काळात चीनच्या गळ्यात गळे घातले होते. आता मुईझ्झू हेही त्याच वाटेने जातील असे मानले जात आहे. हिंदी महासागर प्रदेशातील मोक्याचे ठिकाण असलेला मालदीव हिंदुस्थानसाठी महत्त्वाचा सागरी शेजारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागरमाला’ आणि ‘नेबरहूड फस्ट पॉलिसी’ या संकल्पनेमध्ये मालदीवला विशेष स्थान देण्यात आले आहे. याच शेजाऱयाने आता हिंदुस्थानने सैनिक काढून घ्यावेत, अशी भूमिका घेतली आहे.