पुरुषाला विचारलं गर्भवती आहे का ? उत्तर देण्यास नकार दिल्याने रक्तदानास मनाई केली

स्कॉटलंडच्या स्टर्लिंग शहरात राहणाऱ्या लेस्ली सिनक्लेअर यांनी आजवर 125 बाटल्या रक्तदान केलं आहे. वयाच्या18 व्या वर्षापासून त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली होती आणि ते निमितपणे रक्तदान करत असतात. अशा या लेस्ली यांना यावेळी रक्तदानासाठी गेले असताना एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता की ‘तुम्ही ‘गर्भवती आहात का ?’ लेस्ली यांनी हा रकाना सोडून बाकी फॉर्म भरून दिला. मात्र तुम्ही ‘गर्भवती आहात का ?’ या प्रश्नाचं उत्तर न दिल्याने त्यांना रक्तदानास मनाई करण्यात आली. या आचरटपणामुळे लेस्ली अवाक झाले आहेत.

66 वर्षांच्या लेस्ली यांना क्लिनिकमध्ये गेल्यानंतर एक फॉर्म देण्यात आला. रक्तदानापूर्वी हा फॉर्म भरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. फॉर्म भरत असताना लेस्ली यांना ‘तुम्ही ‘गर्भवती आहात का ?’ हा प्रश्न दिसला. आपल्याला हा प्रश्न लागू होत नसल्याने आपण तो भरू नये असं लेस्ली यांनी ठरवलं होतं. लेस्ली यांनी क्लिनिकमधल्यांना फॉर्म दिला असता त्यांनी तो पाहून लेस्ली यांना ‘तुम्ही ‘गर्भवती आहात का ?’ या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही असं विचारलं. यावर लेस्ली यांनी सांगितलं की हा प्रश्न मला लागू होत नाही. यावर क्लिनिकमधल्यांनी मग तुम्हाला रक्त देता येणार नाही असं सांगून घरी पाठवून दिलं.

स्कॉटलंडमध्ये राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत रक्त जमा करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहीमेत भाग घेण्याऱ्या रक्तदात्यांसाठी एक फॉर्म तयार करण्यात आला असून त्यात 12 नंबरचा प्रश्न हा, ‘तुम्ही गर्भवती आहात का किंवा गेल्या सहा महिन्यात तुम्ही गर्भवती होता का ?’ असा आहे. अनेकदा गर्भवती महिलेचं पोट दिसत नसल्याने ती गर्भवती आहे अथवा नाही हे कळत नाही म्हणून या प्रश्नाचा फॉर्ममध्ये समावेश करण्यात आला होता. पुरुषाला या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबरदस्ती करणं हा काय प्रकार आहे हे लेस्ली यांना कळत नाहीये.