ऐकावे ते नवलच! थप्पडमार स्पर्धेत सर्वाधिक थप्पड खाणारा ठरतो विजेता

सामना ऑनलाईन । मॉस्को

आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांबाबत ऐकले आहे. खाण्याची, धावण्याची, पाककृतीची अशा विविध स्पर्धा होतात. मात्र, रशियात एक विशेष स्पर्धा होते. ‘मेल स्लॅपिंग चॅम्पियनशिप’ म्हणजे थप्पडमार स्पर्धा म्हणून या ओळखल्या जातात. या स्पर्धेतील स्पर्धक एकमेकांना जोरदार थप्पड लगावतात. या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांच्या जास्तीतजास्त थप्पड खाणार आणि ती सहन करणाऱ्याला विजेता घोषित करण्यात येते.

रशियातील क्रास्नोयायासर्कमध्ये नुकत्याच या स्पर्धा रंगल्या होत्या. जगातील ही एकमेव अशी स्पर्धा आहे, जिथे प्रतिस्पर्ध्याला मनसोक्त कानशिलात लगावण्यात येतात. या स्पर्धेच्या नियमानुसार दोन प्रतिस्पर्ध्यांना एका टेबलजवळ उभे करण्यात येते. ते प्रतिस्पर्धी एकमेकांना आळीपाळीने कानशिलात लगावतात. समोरचा प्रतिस्पर्धी पराभव पत्करत नाही तोपर्यंत हे स्पर्धक एकमेकांना कानशिलात लगावत राहतात. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला रोखण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची परवानगी नाही. असे करणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेतून बाद करण्यात येते. तसेच या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही. दोन्ही स्पर्धकांपैकी एखादा खेळाडू पराभव मान्य करत नाही, तोपर्यंत ही स्पर्धा सुरू राहते. एखादा खेळाडू थप्पड खाऊन थकत नाही किंवा त्याची सहनशक्ती संपत नाही तोपर्यंत समोरच्या स्पर्धकाला थप्पड लगावण्याची आणि त्याच्या थपडा खाण्याची चढाओढ सुरू असते. मात्र, या स्पर्धेत हार मानायला कोणाही तयार नसते. त्यामुळे या स्पर्धांतील चुरस वाढत जाते. एखाद्याची सहनशक्ती संपल्याचे जाणवल्यावर प्रतिस्पर्ध्याला विजेता घोषित करण्यात येते.

रशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत वासिली कामोटसकी हा विजेता ठरला आहे. वासिलीच्या प्रतिस्पर्ध्याने त्याला लगावलेल्या थपडींचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. मात्र, वासिलीने मारलेल्या एका थपडीनंतर प्रतिस्पर्धी बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे वासिलीला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले. त्याला पारितोषिक म्हणून 30 हजार रुसी रुबेल(31 हजार रुपये) देऊन गौरवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या