विद्यापीठ प्रशासनाचा अजब कारभार; मुलाच्या हॉल तिकिटावर मुलीचा फोटो

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तरअभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु असून, आजपासून बीए आणि बीएस्सीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. परंतु, त्यात एका विद्यार्थ्याच्या हॉलतिकिटावर विद्यार्थिनीचा फोटो अपलोड  झाला  आहे, तर काही विद्यार्थिनींच्या हॉल तिकिटांमध्ये अनिवार्य इंग्रजी विषयाचा उल्लेखच नाही, असा गंभीर प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप  विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पदवीचे पेपर देता येतील की नाही, याबाबत विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर  आला आहे.

विद्यापीठाने तासिका आणि अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच १५ दिवसांपूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. सर्व विद्यार्थी महाविद्यालयाकडे परीक्षा शुल्क भरतात. त्यावर महाविद्यालय मँडेट जनरेट करून हॉलतिकीट प्राप्त करू शकतील, अशी व्यवस्था आहे. गेल्या आठवड्यात ही असेच विद्यार्थ्यांना ऐनवेळी हॉलतिकीट मिळाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला बीएचे ७१,४०२, बीएस्सीला ६,२९७ विद्यार्थी बसले असून २४० परीक्षा केंद्रे आहेत.

एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ  देणार नाही. दोन महाविद्यालयांमधील  विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये हा प्रकार दिसून आला. परंतु, विद्यापीठाच्या लॉगिनमध्ये तशी समस्या दिसत नाही. सर्व विद्यार्थ्यांना पेपर देता येतील. त्यांचे शैक्षणिक नुकसानहोऊ  देणार नाही. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. निकालाच्या वेळी नंबर तपासण्यात येतील. -डॉ. गणेश मंझा, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

नव्या अभ्यासक्रमाचा पेपर दिल्याने उडाली तारांबळ विद्यापीठाच्या पदव्युत्तर (पीजी) परीक्षेमध्ये सोमवारी पुन्हा गोंधळ उडाला. नागसेनवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी १० ते १ वाजेदरम्यान एमए इंग्रजीचा जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर होता. पण, विद्यापीठाने नव्या अभ्यासक्रमाचा पेपर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. एमए इंग्रजीच्या प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा “लिटरेचर इन इंग्लिश’ हा पेपर होता. सकाळी ९:३० वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा केंद्रावर पेपर पाठवला होता. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात पेपर वितरित केल्यानंतर हा तर नव्या अभ्यासक्रमाचा पेपर आल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर केंद्रप्रमुखाने परीक्षा विभागाला कळवले. विद्यापीठाने लगेच दुसरा म्हणजेच जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर उपलब्ध करून दिला. ८० गुणांचा हा पेपर होता. या गोंधळामुळे जवळपास २०२ विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.