मालेगाव बॉम्बस्फोट खटला पूर्ण व्हायला आणखी किती वेळ लागणार? – कोर्ट

53
bombay-high-court-1

सामना प्रतिनिधी । मुंबई

2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे हा खटला पूर्ण व्हायला आणखी किती अवधी लागणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास यंत्रणे ला (एनआयए) केली.

29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 100 हुन अधिक लोक जायबंदी झाले. या प्रकरणातील संशयित समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचे व्हिडीओ रेकार्ंडग करण्यात यावे तसेच या प्रकरणाचा खटला सहा महिन्यात निकाली काढण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना हा खटला केव्हा संपणार त्याबाबतचा कालावधी तपशीलवार दोन आठवडयात सादर करा असे आदेश दिले. आपली बाजू मांडताना ऍड पाटील यांनी कोर्टाला सांगितले की आत्तापर्यंत 475 पैकी 124 साक्षीदार तपासून झाले आहेत.

बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांवर एनआयए कोर्टात आरोप निश्चीती होणार असून त्याला स्थगिती देण्यात यावी तसेच या प्रकरणातून दोषमुक्त करण्यातत यावे अशी मागणीकरणारी याचिका कर्नल प्रसाद पुरोहीत यांनी हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती ए एम बदर यांच्या खंडपीठासमोर 2 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या