साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यावरील मकोका हटवला

11

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिकर यांच्यावरील मकोका हटवण्याचा आदेश दिला आहे. मात्र या सर्वांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे. तसेच राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दोघांवरही शस्त्रास्त्र कायद्याखाली खटला चालणार आहे.

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांनी आम्हाला आरोपमुक्त करावे, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सर्वांविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील कलम १८ आणि भारतीय दंड संहितेतील कलम ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य कलमांतर्गत खटला चालणार आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने शिवनारायण कालसांग्रा, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. याआधी न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना जामीन दिला होता.

हिंदुत्ववाद्यांना गुंतवण्याचे षडयंत्र!
काँग्रेसच्या कार्यकाळात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, स्वामी अमृतानंदजी आणि अन्य ७ जणांवर ९ वर्षापूर्वी मकोका लावला होता. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी ४ जणांवरील मोकका हटवला आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी पथकासारख्या पोलीस संस्था राजकीय षडयंत्रासारखं काम करतात हे दिसून येते, असा आरोप सनातन संस्थेने केला आहे. तसेच आमचा न्यायदेवतेवर विश्वास असून या प्रकरणात गोवण्यात आलेले सर्व हिंदु निरपराध होतील असे सनातन संस्थेने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या