मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबरपासून नियमित सुनावणी, एनआयएची हायकोर्टात माहिती

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबर पासून सत्र न्यायालयात नियमित सुनावणी घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील संशयित कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या याचिकेवर तसेच या बॉम्बस्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या वडिलांनी केलेला मध्यस्थी अर्ज दाखल करून घ्यायचा की नाही यावर शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी एनआयए कोर्टात खटला प्रलंबित असून हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. संशयित कर्नल प्रसाद पुरोहित यांनी अॅड. नीला गोखले यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून आपल्याला दोषमुक्त करावे तसेच आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप रद्द करावे अशी विनंती कोर्टाला केली आहे तर आपल्या मुलाचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने निसार अहमद बिलाल यांनी अॅड. बी ए देसाई यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. एनआयएच्या वतीने अॅड. संदेश पाटील यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या