लोभी गाँव में लबाड भूखा नहीं मरता।

74

बाबासाहेब गायकवाड, नाशिक

मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. स्वतःची महापौर पदाची उमेदवारी जाहीर करणारे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख, राष्ट्रवादी-जनता दल युतीचे नेते माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि अनेक पक्षांतरानंतर आता एमआयएमचे नेतृत्व करणारे युनूस ईसा यांच्यात चुरस आहे. हे सर्वचजण एकमेकांना भ्रष्टाचारी, धोकेबाज, लबाड म्हणून हिणवत असले तरी दगाबाजीतूनच आजपर्यंत त्यांनी महापालिकेची सत्ता उपभोगली आहे. ऐंशी टक्के मुस्लीमबहुल भागालाच ते शहर अर्थात गाँव मानतात. यहाँ तो हम ही जितेंगे, असा त्यांचा दावा आहे. सत्तेचा तुकडा आपल्याच झोल्यात पडणार अशी त्यांची अपेक्षा आहे. जनता दल नेते स्वर्गीय निहाल अहमद यांच्या गैरहजेरीतील ही पहिली निवडणूक आहे, ‘लोभी गाँव में लबाड भूखा नहीं मरता’, या त्यांनी केलेल्या टिकेचा प्रत्यय आजही येतोय.

nihal-ahamed

तब्बल सत्तावीस वर्षे आमदार राहिलेले जनता दल नेते स्वर्गीय निहाल अहमद, त्यांचेच चेले असलेले काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख, युनूस ईसा यांनी नगरपालिकेची सत्ता आलटून पालटून उपभोगली, ती गटबाजी आणि फोडाफोडीच्या राजकारणातूनच. महापालिकेतही ही परंपरा कायम राहिली, त्यात भर पडली ती माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची. सन २००१ला कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या समर्थनार्थ तसबीर गळ्यात घालून निहाल अहमद मालेगावात रस्त्यावर उतरले, तेथे दंगल उसळली, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत बहुमत घेऊन ते पहिले महापौर झाले, मात्र पाच वर्षे सत्ता टिकवू शकले नाहीत.

rashid_shaikh-malegaon

अडीच वर्षात रशीद शेख यांनी जनता दलात फूट पाडून मुलगा आसिफला महापौर केले. आठ सप्टेंबर २००६ला शब्ब-ए-बारातच्या दिवशी बडा कब्रस्ताननजीक मस्जीदीत व मुशहरा चौकात सायकल बॉम्बचा धमाका झाला, त्यात ३७जण ठार झाले, शंभरहून अधिक जखमी झाले. हा हादसा मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासाठी मौका ठरला, अटक केलेल्या संशयितांसह धर्मांधांचा कैवार घेत त्यांनी सरकार व पोलिसांना टीकेचे लक्ष्य केले. त्यानंतर तिसरा महाज अर्थात आघाडीद्वारे २००७ची महापालिका निवडणूक लढवून सर्वाधिक २८ जागा मिळवून सत्ता हस्तगत केली. हाजी मजमुद्दीन शेख गुलशेर यांना महापौर केले. अडीच वर्षानंतर महाजची सत्ता गेली. शहर विकास आघाडीचे युनूस ईसा यांचे पुत्र मलीक हे महापौर झाले. २००९ला तिसरा महाजच्या आधाराने मौलाना मुफ्ती मालेगावचे आमदार झाले. त्यानंतर महाजला सोडून त्यांनी राष्ट्रवादीतर्फे २०१४ची विधानसभा निवडणूक लढविली, त्यात ते पराभूत झाले.

mufti-mohommed

सन २०१२च्या निवडणुकीत माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मौलाना मुफ्तींशी युती करून शेख रशीद यांनी पत्नी ताहेरा यांना महापौरपदी विराजमान केले. अडीच वर्षांनंतर ही युती तुटली आणि महाजचे हाजी मोहम्मद इब्राहीम हे महापौर झाले.

२४ मे रोजी महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काँग्रेस रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहे, ते स्वतः महापौर पदाचे उमेदवार असल्याचा ऐलान त्यांनीच केला आहे. पत्नी व मुलासह त्यांनी ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे मौलाना मुफ्ती व निहाल अहमद यांचे पुत्र जनता दलाचे बुलंद एकबाल यांची युती झाली आहे. हे दोघे ८४ पैकी ७४ जागा लढविणार आहेत. त्यात जनता दलाला १२ जागा दिल्या जातील, असे मुफ्तींनी सांगितले.

अनेक पक्षांमध्ये जावून सत्ता उपभोगणारे माजी नगराध्यक्ष युनूस ईसा, त्यांचे पुत्र माजी उपमहापौर, एमआयएमचे शहराध्यक्ष मलीक ईसा हे एमआयएमसाठी उमेदवारांच्या शोधात आहेत. मुफ्ती आणि रशीद शेख हे काही जागी एमआयएमची सोय करीत असल्याच्या संशयाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेतृत्व करीत असलेले हे नेते एकमेकांना धोकेबाज, लबाड, भ्रष्टाचारी म्हणून हिणवत विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जात आहेत. या सर्वांनीच सत्तेच्या लोभापायी सलगी आणि धोकाधडी करून सत्ता उपभोगली आहे, तेव्हा ते मालेगावचा विकास करू शकले नाहीत, पैशांसाठी सत्ता आणि पैशांतून सत्ता हे सूत्र असल्याचा आरोप ते एकमेकांवर करीत आहेत. ८४ पैकी ६४ जागा या पूर्व म्हणजे मुस्लीमबहुल भागात येतात. या भागालाच ते शहर अर्थात गाँव मानतात. ‘गाँव में हम जितेंगे’ असा त्यांचा दावा आहे. सध्या अलग अलग असले तरी निवडणुकीनंतर सत्ता, लोभापायी हम सब एक है असा ऐलान हेच करतील, इन सबके झोले में कुछ ना कुछ तो पडेगाही । ‘लोभी गाँव में लबाड भूखा नहीं मरता’ ऐसा निहालभाईने कहा था । यही आखरी सच है, अशी चर्चा मालेगावात सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या