मालेगावच्या युनानी काढ्याचा राज्यभर बोलबाला, हजारो कोरोना योद्ध्यांकडून वापर

4920

एप्रिलमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरातील रुग्णसंख्या जूनअखेरीस झपाट्याने कमी झाली. यामुळे मालेगाव पॅटर्नइतकीच राज्यभरात तेथील मन्सुरा कॉलेजच्या युनानी काढ्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हे कोरोनावरील औषध नाही. मात्र, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे. थंडी, ताप, खोकला, श्वसनविकार, विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणार्‍या नऊ औषधींचा हा काढा कोरोनाशी लढण्याचे बळ देणारा ठरला. प्रारंभी मालेगावातील पोलिसांसह कोरोना योद्ध्यांनी याचा वापर केला असून, आता तो राज्यभर पोहचला आहे. कॉलेजच्या माध्यमातून तीन महिन्यात एक लाख जनतेने हा काढा घेतला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान वाढले. मात्र, योग्य उपचारपद्धती अभावी संसर्गापासून बचाव करणे एवढेच हाती होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने शहरातील चिंता वाढली. मालेगावच्या मन्सुरा येथे 40 वर्षांपासून मोहम्मदीया टीब्बीया युनानी मेडिकल कॉलेज आहे. संस्थेचे चेअरमन अर्शद मुख्तार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अबूल इरफान, उपप्राचार्य डॉ. सय्यद मिनहाज, डॉ. अब्दुल मजीद यांच्या टिमने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘युनानी जोशंदा’ अर्थात काढ्याचे फॉर्म्युलेशन केले. आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमधील औषधं यात आहेत. त्याचबरोबर पूर्वीपासून येथे पाच ते सहा औषधी थंडी, ताप, श्वसनविकार अशा आजारांवर वापरली जात होती. कोरोनातील दहा-बारा लक्षणांचा विचार करून संशोधनाअंती महत्त्वाच्या नऊ औषधींचा वापर करून हा काढा तयार करण्यात आला. हा इम्युनिटी बूस्टर काढा सर्वप्रथम मालेगावात तैनात असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील कर्मचार्‍यांना देण्यात आला, त्याचे चांगले परिणाम दिसून आले. डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, तहसील, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, तसेच मुंबई, पुणे पोलिसांना ही पाकिटे दिली. मालेगावसह राज्यभरात हा ‘मन्सुरी काढा’ अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे.

असा आहे काढा
या काढ्यात मुलेठी, उनाब, खाक्सी, गौजबन, खात्मी, खुब्बाजी, सफीस्तान, अडुळसा, उस्तखुडस औषधी आहेत. या प्रत्येकी सहा ग्रॅम घेवून पावडर केली जाते. त्यातील सहा ग्रॅम पावडर उकळून काढा होतो, तो दोन वर्षांपुढील सर्वांसाठी उपयुक्त आहे. याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. दिवसातून तो दोनदा घ्यावा लागतो.

आजपासून मशीनद्वारे निर्मिती
या कॉलेजचे फार्मसी डिपार्टमेंट काढ्याची निर्मिती करीत आहे. इतके दिवस केवळ हातानेच काम सुरू असल्याने दिवसाला तीन हजार पाकिटे तयार होत होती. उद्या सोमवारपासून मशीनचा वापर केला जाईल, त्यामुळे पाकिटे तयार करण्याचे काम दुप्पटीने वाढणार आहे.

रुग्णसेवेतच आनंद
मालेगाव शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला, हे सर्व पॅथींच्या डॉक्टरांच्या टिमवर्कचे फळ आहे. मालेगाव महापालिकेने सुरुवातीला मन्सुरा कॉलेज संस्थेच्या चार इमारतींमध्ये कोविड रुग्णांसाठी अडीचशे बेडची व्यवस्था केली. येथील डॉक्टर, कर्मचारी वर्ग पूर्णवेळ रुग्णसेवेत होते. काढा रुग्णांसाठी उपयुक्त ठरला याचा आनंद वाटतो. यापुढेही रुग्णसेवेला प्राधान्य देत कार्यरत राहू, असे डॉ. सय्यद मिनहाज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या