सिंधुदुर्ग : पावसाने फुगलेल्या नदीने जमीन गिळली, मसुऱ्यातील कावावाडी ग्रामस्थांमध्ये घबराट

1731

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहात आहेत. मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे नदीच्या वाढत्या प्रवाहाने किनारपट्टी गिळंकृत केली आहे, यामुळे नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ऐरवी छान वाटणाऱ्या या नदीने आता तिचे रौद्ररुप दाखवायला सुरुवात केली असून तिच्या प्रवाहामध्ये इथल्या एका घरासमोरील तुळशी वृंदावन आणि तीन मीटर भूभाग कोसळला.

नदीचे पात्र फुगत चालले असून त्यामुळे किनाऱ्यालगतच्या ग्रामस्थांमध्ये घबराट पसरायला लागली आहे. पावसामुळे नदी पुगत चालली असून यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून घर आणि नदीपात्र यात केवळ एक ते दोन मीटर अंतर राहिले आहे. ग्राम पंचायत सदस्या सारिका मुणगेकर यांनी ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाला या परिस्थितीची माहिती तातडीने दिली आहे. किनारपट्टीलगत साबाजी हडकर, विजय हडकर व अन्य ग्रामस्थ यांची घरे आहेत. किनारपट्टीची धूप होत असल्याने वर्षभरापूर्वी येथील ग्रामस्थांनी किनारपट्टीला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता नदीने किनारपट्टी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या