घटस्फोटित, विधवांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गडाआड, 15 गुन्हे उघड

1276

आर्थिक लाभपोटी घटस्फोटित, विधवा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून ‘जीवनसाथी’ या संकेतस्थळावरून तब्बल 15 महिलांशी लगट करणाऱ्या पुणे हडपसर येथील संपत चांगदेव दरवडे (वय 34, मूळ रा. कुकाना तळेवाडी, नगर) याला मालवण पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. मालवण न्यायालयाने त्याला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवण कुंभारमाठ येथील पीडित घटस्फोटित महिलेने मालवण पोलीस ठाण्यात 9 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयितावर पोलिसांनी बलात्कार, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत होते. नाशिक येथील एका महिलेशी लगट करून लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा त्याने प्लान आखला असताना पीडित महिलांनी नाशिक पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर त्याला एका हॉटेलमधून पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

2014 साली रीतसर लग्न झाले असून त्याचे एक अपत्य आजाराने मरण पावले. त्यावेळी त्याच्या डोक्यावर 12 ते 13 लाखाचा कर्जाचा बोजा होता. त्यावेळी त्याला घटस्फोटित, विधवांशी जवळीक करून पैसे तसेच त्यांचे शारीरिक शोषण करण्याची शक्कल त्याने लढवली. स्वतः घटस्फोटीत असल्याचे भासवून त्याने नागपूर येथील महिलेशी लग्न करून सुमारे 50 हजार उकळले. त्यानंतर त्याने याच पद्धतीने सुमारे 15 महिलांची फसवणूक केली आहे. त्याचा चष्मा साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय होता, असे पोलिसांनी सांगितले.

संकेतस्थळावर संपत याने मनोज पाटील, मयूर पाटील अशा नावाने नाशिक, लोणावळा, पुणे, अमरावती, सिंधुदुर्ग, नागपूर, ठाणे तसेच इंदोर (मध्यप्रदेश) अशा अनेक ठिकाणच्या विधवा व घटस्फोटित महिलांचे शारीरिक शोषण करत आर्थिक गंडा घातल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ठाणे, नाशिक व मालवण पोलीस ठाण्यात संशयित दरवडे याच्यावर विविध गुन्हे दाखल असून तो फरार होता. नाशिक पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मालवण पोलिसांनी त्यास नाशिक येथून अटक केली.

‘स्वीट लेडी विथ वन एम’
संपत याला पोलिसांच्या तावडीत देण्यासाठी कुंभारमाठ येथील पीडित महिलेने पुढाकार घेतला. फसवणूक झालेल्या सर्व महिलांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व महिलांची माहिती घेत ‘स्वीट लेडी विथ वन एम’ या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या आधारे महिलांनी त्याला पोलिसांच्या जाळ्यात देण्यासाठी चंग बांधला. संपत याने नाशिक येथील महिलेला फूस लावणार असल्याची कुणकुण लागताच पीडित महिलांसह मालवण पोलीस व नाशिक पोलिसांच्या सहकार्याने संपत दरवडे याचा नवा डाव उधळून लावला.

आपली प्रतिक्रिया द्या