गोडवा  मालवणीचा

मनीषा सावंत

मालवणी भाषेचं माधुर्यच वेगळं आहे. म्हणूनच तर बऱयाच मालिका, मराठी चित्रपट यात खास मालवणी भाषिक माणूस दाखवला जातोच.

प्रत्येक भाषेचे खास वैशिष्टय़ असतेच, पण मालवणी भाषेचा गोडवा काही औरच… मी स्वतः मालवणी आहे म्हणून नव्हे तर कोणत्याही भाषेतील मनुष्य भेटतो तेव्हा त्याच्याविषयी आपुलकी वाटत नाही. पण… मालवणी भाषेत कुणी बोलत असेल तर आपल्या घरचंच कुणीतरी आपल्याशी बोलतंय असं वाटायला लागतं. कारण मालवणी भाषेचं माधुर्यच असं आहे.

झी टीव्हीवर काही महिन्यांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ ही कोकणातील मालवणी माणसांवर बेतलेली मालिका तुफान गाजली. त्यानंतर याच वाहिनीवर ‘गाव गाता गजाली’ ही मालिकाही मालवणी भाषेचा गोडवा गाणारीच होती.

‘कोकणची माणसं साधीभोळी’… म्हणतात ते उगीच नाही. हाच साधेभोळेपणाचा गोडवा त्या भाषेला आहे आणि तो मालिका, चित्रपट यातून दिसतो. मालिका, सिनेमांतून मालवणी बोलीचा कापर काढत आहे. मालवणीचा गोडवा मधाळ वाटतोय म्हणूनच या बोलीला आणि ती बोलणाऱया व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केदार धारवाडकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘सिनेमास्कोप’ नावाच्या सिनेमातले एक गाणे मालवणी भाषेत होते.

मालवणी भाषेची खरी ओळख पटते ती त्यातून ऐकायला मिळालेल्या शिव्यांमुळे… मालवणीत दिल्या जाणाऱया शिवीचा अर्थ प्रत्यक्षातील तोच नसतो. बोलणाऱयाला कदाचित वेगळा, जरा चांगला अर्थही अपेक्षित असेल, पण दुसऱया भाषिकांना त्या शिव्याच वाटतात. साधारणपणे दर दोन-तीन वाक्यांच्या दरम्यान मालवणी माणसाची एखादी शिवी येतेच. ती शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला येते. प्रमाण भाषेच्या अनुषंगाने या शिव्या अश्लील वाटल्या तरी त्या नेहमी वापरत असल्याने त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. आपल्या माणसाशी बोलताना तर मालवणी माणूस अशी एखादी तरी शिवी दिल्याशिवाय राहूच शकत नाही.

गुरू ठाकूर यांनीच लिहिलेलं ‘कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो’ हे मालवणी गाणे लोकप्रिय झाले आहे. गीतकार कलय मुळगुंद यानं लिहिलेलं ‘झोकात ईली झंक्याची स्कारी’ ही दोन्ही गाणी मालवणी बाजाची आहेत. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या सिनेमातील ‘तुका साद तुझ्या माहेराची वाट देतो गो’ हे गाणंही लोकप्रिय झालं होतं.

कलाकारही लोकप्रिय

आपल्या भाषेतील संभाषण दुसऱया राज्यात ऐकायला मिळाल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो. एखाद्या ठरावीक भाषेत बोलणारा अभिनेता जास्त लोकप्रिय होतो. म्हणूनच तर संतोष पवार, कुशल बद्रिके, भाऊ कदम लोकांना आवडतात. मुळात कथानक सादर करताना ते वास्तव वाटावे यासाठी एखादी ठरावीक भाषा वापरली जाते. एखाद्या खास समाजातील कुटुंबावर सिनेमा असेल तर मग त्याच समाजाची भाषा वापरली तरी लोक लगेच कनेक्ट होतात हा अनुभव आहे. याच अनुषंगाने मालवणी भाषा आणि तिचा गोडवा मराठी सिनेमांमध्ये भावलेला आहे.