मालवणी येवकच व्हयी!

>>  स्वरा सावंत

सुरुवातीला तीन डिझाइन घेऊन सुरू केलेला हा प्रवास आता 12 हुन अधिक डिझाइनवर आला आहे. यामध्ये फेमस मालवणी शब्द जसे, ह्यो काय माका शिकवतलो, देवाक काळजी, बघ कसो मरता, आवशीचो घो, मालवणचा चेडू, मालवणचो झील या टीशर्टला विशेष मागणी आहे, तर हिंदी, इंग्लिशमध्ये मिळणारे कपल टीशर्ट यामध्ये ह्यो माझा घोही माझी बायल, कुडाळचो नवरोकणकवलीची नवरी असे पर्याय बायग्याने दिले आहेत.

समाधान यादव या कोकणच्या झीलाने ‘बायग्या’ या बॅण्डच्या माध्यमातून आपल्या मालवणी भाषेचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. ‘चला आपली बोली देहावर मिरवूया’ अशी टॅगलाइन घेऊन भाषेचा अभिमान मिरवण्याची संधी ‘बायग्या’ने दिली आहे.

येवा कोकण आपलाच आसा… असे नाही तर आता कोकणात येवचा आसात तर मगे मालवणी येवकच व्हयी हे अभिमानाने सांगण्याची पद्धत कोकणातल्या पुढच्या पिढीने सुरू केली आहे.

मुळचा वैभववाडीत गाव कुडाळ, पण सध्या कामानिमित्त कल्याणला राहणाऱया समाधान यादव या कोकणच्या झीलाने आपल्या मावशीच्या लाडीक नावावरून 2017 मध्ये हा हटके बॅण्ड सुरू केला. सुरुवातीला पंटेंट क्रिएटर, मिम्समधून लोकप्रियता मिळवत यंग जनरेशनला आपलेसे केले. मालवणी पॉडकास्ट, पण यानेच पहिल्यांदा आणला. देश-विदेशातल्या कोकणी माणसाला आपलेसे काय वाटेल या विचारातून मग 2019मध्ये ‘बायग्या’ने टी-शर्ट लॉन्च केले. मालवणी भाषेचा गोडवा, शिवीतही कसा आपुलकीचा वाटतो. रोजच्या वापरातले शब्द त्यात प्रमाण भाषेला सुबक वळण देत पिढय़ान्पिढय़ा वापरल्या जाणाऱया म्हणी ‘बायग्या’ने जगाच्या पाठीवर या टी- शर्टच्या माध्यमातून पोहोचवल्या. अगदी लहानापासून ते थोर मोठेही आता अभिमानाने मालवणी मिरवू लागले.

मालवणी मुलगा, बोरीवलीचा मित्र राहुल चव्हाण, आर्टिस्ट मंदार शिरोडकर आणि क्षितिज नेरुरकर यांची मोलाची साथ लाभली. लग्नानंतर बायको अमिता कदम हिनेही या उपक्रमात मोठा पाठिंबा दिला. इन्स्टाग्राम, फेसबुकवरून सुरू असलेला मालवणीचा प्रसार आता प्रदर्शने,
स्टॉलवरूनही करण्यात येत आहे. यासाठी नुकतीच शिवजयंतीच्या मुहूर्तावर www.baygya.comची सुरुवात झाली. काम करून आपल्याला मालवणी भाषेसाठी काही करायचे आहे हे आधीपासून ठरलेले, त्यामुळे आमच्यातील प्रत्येक जण आपले काम सांभाळून या भाषेच्या प्रसारात उतरल्याचे समाधान सांगतो.

आमच्या भविष्याची देवाक काळजी

कोकणचो हय़ो प्रांतवाद आडवो इलोच तर मगे…?  काळजी नसावी म्हणून ‘बायग्या’ भविष्यात कोकणी, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणेकरांनाही त्यांचा अभिमान मिरवण्याची संधी देणार आहे. सध्या कोकणातल्या गावकऱयांसाठी आपल्या गावची स्पेशालिटी ‘बायग्या’ आणत असून यात चिंदर गावची गावपळण, मालवण किल्ला, मालवणी खाजा, जत्रा, शिमगो यावर काम सुरू आहे. लंडन, न्यूझीलंड, आबुदाबीला पोहचलेला ‘कोकणातला बायग्या’ सिनेमा कोलॅबरेशनच्या तयारीत आहे. त्यामुळेच आमचा भविष्य उज्ज्वल आसा… देवाकd काळजी आसा, असे ‘बायग्या’ अभिमानाने सांगतो.