ममता आणि अखिलेशची हातमिळवणी, काँग्रेसला सोबत न घेता करणार नवीन आघाडी

समाजावादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शुक्रवारी कोलकाता येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी नव्या आघाडीत एकत्र येण्यास संमती दर्शवली आहे. मात्र या नव्या आघाडीत ते काँग्रेसला न घेता ही आघाडी स्थापन करणार आहेत.

ममता बॅनर्जी या लवकरच ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही पुढच्या आठवड्यात भेट घेऊन नव्या आघाडीविषयी चर्चा करणार आहेत. ”भाजपला राहुल गांधी यांना विरोधकांच्या आघाडीचा चेहरा बनवायचा आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होईल असे त्यांना वाटते. काँग्रेस या नव्या आघाडीचे नेतृत्व करतेय असा भ्रम निर्माण केला जात आहे, असे तृणमूल काँग्रेस खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले.

”ममता बॅनर्जी 23 मार्चला नवीन पटनायक यांना भेटणार आहेत. त्यावेळी आम्ही या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच इतर विरोधी पक्षांशीही यावर चर्चा होईलच. ही तिसरी आघाडी नाही पण स्थानिक प्रांतिक पक्षही भाजपच्या वरचढ होऊ शकतात हे दाखवायचे आहे’, असे बंडोपाध्याय यांनी सांगितले.