‘हिंमत असेल तर भाजपने मला अटक करावी, तुरुंगातूनही निवडणूक जिंकेन’; ममता बॅनर्जी यांचे आव्हान

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधक यांनी आतापासूनच प्रचाराला गती दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत भाजपला आव्हान दिले आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला अटक करून दाखवावी,  आपण तुरुंगात राहूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बांकुडामध्ये घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपला आव्हान दिले.

तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना भाजप प्रलोभन दाखवत आहे. तृणमूल सोडून त्यांनी भाजपची साथ द्यावी, यासाठी आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवण्यात येत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला. भाजप खोटारड्यांचा पाठिराखा असून देशासाठी अभिशाप असल्याची टीकाही बॅनर्जी यांनी केली.

आमच्या आमदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. काहीजण यासाठी सट्टेबाजांसारखे काम करत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला. भाजप सत्तेत येईल, असा भ्रम जनतेत पसरवण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

निवडणुका जवळ आल्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी स्टिंग ऑपरेशन आणि घोटाळा यांचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. मात्र, आपण भाजप किंवा त्यांच्या कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला अटक करावी, आपण तुरुंगात राहूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जवळ येत असल्याने आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या