सस्तन प्राणी गुदद्वारातूनही घेऊ शकतात श्वास, मानवातही असू शकते क्षमता; संशोधकांचा दावा

जपानच्या वैज्ञानिकांनी एक वेगळाच शोध लावला आहे. सस्तन प्राणी हे आपात्कालीन परिस्थितीमध्ये गुदद्वारातून श्वास घेऊ शकतात असं या संशोधकांनी म्हटलं आहे. गुदद्वारातून श्वास घेतल्याने त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो असा दावा या संशोधकांनी केला आहे. समुद्रातील काही जीव हे आपात्कालीन परिस्थितीत आतड्यांद्वारे श्वास घेत असल्याने हे वैज्ञानिक आश्चर्यचकीत झाले होते. जमिनीवर राहणारे सस्तन प्राणी फक्त नाकाद्वारेच श्वास घेऊ शकतात का? असा प्रश्न या संशोधकांच्या मनात निर्माण झाला होता. टोकियो वैद्यकीय विद्यापीठातील या संशोधकांनी या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी उंदीर आणि डुकरांवर प्रयोग करायला सुरुवात केली होती.

संशोधकांनी दावा केला आहे की गुदद्वारातून श्वास घेण्याची प्रक्रिया माणसावरही लागू केली जाऊ शकतो. असं झालं तर श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या आणि व्हेंटीलेटर सुविधा मिळू न शकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो असं संशोधकांचं म्हणणं आहे. सस्तन प्राण्यांमध्ये श्वसनयंत्रणा विकसित झालेली असते. फुफ्फुसांच्या मदतीने श्वासोच्छवासाचे काम शरीरात सुरू असते. संशोधकांचं म्हणणं आहे ‘लोच’ मासा, कॅटफिश, सी कुकुंबर या समुद्री जीवांमध्ये श्वास घेण्याची पर्यायी व्यवस्था असते. या व्यवस्थेमुळे ते आतड्यांद्वारे श्वास घेऊ शकतात.

मुख्य संशोधक असलेल्या रयो ओकाबे यांनी म्हटलं की आपल्या गुदद्वारात अनेक रक्तवाहिन्या असतात. याचाच अर्थ हा होतो की जर या मार्गाने औषध दिलं गेलं तर ते रक्तात पटकन मिसळू शकतं. ओकाबे यांनी म्हटलंय की ही बाब ध्यानात आल्याने आमची जिज्ञासा वाढली होती की जर गुदद्वाराने ऑक्सिजन दिला तर तो रक्तात मिसळेल अथवा नाही. ओकाबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जिज्ञासा क्षमवण्यासाठी उंदीर आणि डुक्कर यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी केले. यानंतर त्यांनी गुदद्वाराने त्यांना द्रवरुपातील तसेच वायूरुपातील ऑक्सिजनचा पुरवठा केला. हा प्रयोग यशस्वी झाला आणि ऑक्सिजन पटकन त्यांच्या शरीरात पोहोचला. कमी कष्टात या सस्तन जीवांच्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यात संशोधकांना यश मिळालं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या