निवडणूक जिंकवून देण्यासाठी त्याने मागितले १५ लाख

40
विजय जोशी । नांदेड
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी तेथील उमेदवारांना निवडणूक आयुक्तांच्या नावाने खोटे मेसेज पाठविणाऱ्या तरुणाला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने निवडणूक जिंकून देण्यासाठी उमेदवारांकडून १५ लाखांची मागणी केली होती. सचिन दत्ता राठोड (२१) असे त्या तरूणाचे नाव असून तो सध्या यूपीएस्सीच्या परीक्षेची तयारी करत आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले.
सचिनने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी तेथील भाजप व्यतीरिक्त इतर पक्षाच्या उमेदवारांना  निवडणूक आयुक्तांच्या नावाने मेसेज पाठविले होते. या मेसेजमध्ये त्याने उत्तरप्रदेशची पुनरावृत्ती हिमाचल प्रदेशमध्ये होता कामा नये त्यासाठी १५ लाख रूपये द्या आणि निवडणूक जिंका. निवडणुकीच्या आधी १० लाख व जिंकल्यानंतर पाच लाख द्या, असे लिहले होते.
अशा प्रकारचे मेसेज त्याने हिमाचल प्रदेशमधील ४२ जणांना पाठविले होते. याप्रकरणी एका उमेदवाराने शिमल्यातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना हे मेसेज नांदेड येथून आल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणाच्या तपासाअंती नांदेड पोलिसांनी किनवट तालुक्यातील दयाल गावातून सचिनला अटक केली. सचिनने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून सध्या तो यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहे.
नांदेड निवडणुकीच्यावेळी पाठविलेले मेसेज 
सचिनने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नांदेड येथे झालेल्या वाघोळा महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काही उमेदवारांना याच प्रकारचे मेसेज निवडणूक आयोगाच्या वतीने पाठविले होते. त्या मेसेजमध्येही त्याने निवडणूक जिंकण्यासाठी १५ लाख रूपये देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी हे प्रकरण उघड झाले नव्हते. सचिनला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिली.
आपली प्रतिक्रिया द्या