झटपट श्रीमंतीसाठी चोरले सोने, केमिस्टमधून घेतले गुंगीचे औषध

गोरेगाव येथे ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱया नोकराला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपये किमतीचे सोने घेऊन पळालेल्या चोरटय़ाला अखेर गोरेगाव पोलिसांनी अटक केली. सुरेश लोहार असे त्याचे नाव आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा कट रचला. ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी तो खास राजस्थान येथून मुंबईत आला होता.

गोरेगाव परिसरात एक ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या रविवारी ज्वेलर्समधील कर्मचारी हा जेवायला गेला. त्यानंतर तो रात्री दुकानात आला. तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्याला गुंगीचे औषध देऊन दुकानातून लाखो रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. याची माहिती ज्वेलर्सच्या मालकाने गोरेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अतुल सानप, सुदर्शन पाटील आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासा दरम्यान पोलिसांना लोहारची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक राजस्थान येथे गेले. तेथे पोलिसांनी फिल्डिंग लावली. राजस्थान येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी लोहारला ताब्यात घेतले. लोहारने 2018 साली वडाळा परिसरात अशाच प्रकारे गुन्हा केला होता. त्या गुह्यात त्याला तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा चोऱया करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पकडू नये म्हणून लोहारने त्याच्या मोबाईलचा वापर केला नव्हता. लोहार हा पूर्वी त्या दुकानात काम करायचा. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने कट रचला.

गेल्या आठवडय़ात तो मुंबईत आला. गोरेगाव येथे तो एकाला भेटला. त्यानंतर दुकानातील कर्मचारी आणि तो कामाठीपुरा येथे फिरायला गेले. रात्री दुकानातील कर्मचारी हा पुन्हा आला. तेव्हा लोहारने त्याला अडवले. लोहारने गुंगीचे औषध असलेला रुमाल त्या नोकराच्या तोंडाला बांधला. त्यामुळे नोकर बेशुद्ध झाला. नोकर बेशुद्ध झाल्यावर लोहारने चांदी आणि सोने घेऊन पळ काढला. तो टॅक्सीने दहिसर येथे गेला. त्यानंतर ऑटोने चारोटी नका येथे पोहचला. तिथून बोलेरो गाडीने तो राजस्थान येथे गेला. लोहारने ते चोरीचे दागिने त्याच्या ओळखीच्या महिलेच्या घरी लपवून ठेवले होते. लोहारला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.