स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला, विकृताला अटक

आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या एका विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा ही बाब उघड झाली.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे दांपत्य पुण्यात राहतं. आरोपी देहू, पिंपरी-चिंचवड, भोसरी अशा भागांमध्ये प्लंबर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी घरकाम, मासेविक्री करून चरितार्थ चालवते. या जोडप्याला दोन मुली आहेत. आरोपीने देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्याच्या तक्रारीमध्ये आपली बायको आपल्याला घरी खूप छळते असं नमूद होतं. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवलं. तेव्हा पत्नीने त्याचे कारनामे उघड केले. आरोपी तिला घरी छळत असे. उपजीविकेसाठी प्लंबिंग करायचं सोडून तो घरातील कोणतीही जबाबदारी उचलत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून हे सर्व सुरू असल्याचं त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं. त्यांच्यात वरचेवर वाद होत असत आणि तो मारहाण करत असल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं.

बायकोचा खुलासा ऐकून पोलिसांनी तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतला आणि त्याची कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याचा मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आला. जेव्हा त्याचा मोबाईल फोन तपासला तेव्हा त्यात त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ दिसला. ते पाहून पोलीसही चक्रावले.

या व्हिडीओवरून पोलिसांनी त्याला विचारलं तेव्हा त्याने बायको आंघोळीला गेली असताना हा व्हिडीओ बनवल्याचं कबूल केलं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी 345 ए अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या