बिबट्याची कातडी विकण्यासाठी विद्याविहार येथे आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाखो रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.
एक व्यक्ती बिबट्याचे कातडे विकण्यासाठी विद्याविहार येथे येणार असल्याची खबर युनीट 5 चे उपनिरीक्षक अंकुश न्यायनिर्गुणे यांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक अजित गोंधळी, सपोनि अमोल माळी व पथकाने विद्याविहार येथील एफडीआयएल कॉम्लेक्स परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती तेथील एका रिकाम्या गाळ्यात येऊन थांबला. पाच मिनिटं त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर पथकाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा त्याच्याजवळ बिबट्याचे लाखो रुपये किंमतीचे कातडे मिळून आले. गणेश रहाटे (55) असे त्या आरोपीचे नाव असून तो न्युज प्रभादेवी येथील बोटावाला चाळीत राहतो. हे कातडे तो कोणाला विचार होता तसेच त्याने ते कुठून आणले होते याची पोलिस चौकशी करीत आहेत.