25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून पळणारा गजाआड

जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी बोलावलेल्या सुरतमधील व्यावसायिकाची पैशांची बॅग चोरून पळालेल्या एकाला अखेर साकीनाका पोलिसांनी अटक केली. शैलेश गौतम गायकवाड असे त्याचे नाव असून त्याच्या दुसऱ्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार हे सुरत येथील रहिवासी असून ते व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी त्याची ओळख फरार आरोपीसोबत झाली होती. ओळखीनंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. डिसेंबर महिन्यात फरार आरोपीने तक्रारदारांना फोन करून जागेचे पेपर दाखवत सौदा करायचा आहे असे सांगून त्यांना साकीनाका परिसरात बोलावून घेतले. जागेचा करार होणार या हेतूने तक्रारदारांनी बॅगेत 25 लाख रुपये आणले होते. साकीनाका येथील एका हॉटेलजवळ ते तिघे भेटले. भेटल्यावर तक्रारदार हे जागेचे पेपर पाहत असतानाच संधी पाहून शैलेशने पैशांची बॅग चोरली. बॅग चोरून तो रिक्षाने ठाण्याला गेला. त्यानंतर फरार आरोपीदेखील हा शैलेशच्या गाडीने ठाण्याला पळून गेला. बॅग चोरी झाल्याप्रकरणी तक्रारदारांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा केला.

परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त एम. रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहायक निरीक्षक लीलाधर पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका फुटेजमध्ये गाडीचा नंबर मिळाला. त्या गाडीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली ती गाडी त्यांनी काही महिन्यांपूर्वी शैलेशला विकल्याचे समोर आले. त्या गाडीवरून पोलिसांनी शैलेशची माहिती काढली. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस शैलेशचा शोध घेत होते. अखेर त्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली. बॅग चोरल्यावर ते दोघे ठाण्याला गेले. ठाण्याला गेल्यावर फरार आरोपीने शैलेशला काही रक्कम दिल्याचे तपासात समोर आले आहे. शैलेशला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या