ड्रग्जच्या धंद्यातून कोटय़वधीची संपत्ती, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

प्रातिनिधिक फोटो

गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ड्रग्जचा मोठा कारोभार उद्ध्वस्त केला होता. अंबरनाथ, पालघर आणि गुजरातच्या अंकलेश्वर येथे धडक कारवाई करत तब्बल 4856 कोटी 71 लाख किमतीचा एमडीचा साठा जप्त करून आठ ड्रग्जमाफियांना गजाआड केले होते. यातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश सिंग याने ड्रग्जच्या पैशातून कोटय़वधीची संपत्ती जमा केली होती. त्यापैकी दोन कोटी 56 लाख 39 हजार किमतीची स्थावर मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी युनिटच्या पथकाने गत वर्षी एमडी ड्रग्जची निर्मिती आणि विक्री करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या रॅकेटचा म्होरक्या आणि मुख्य ड्रग्ज माफिया प्रेमप्रकाश सिंग याच्या अंबरनाथ, पालघर व अंकलेश्वर येथील कारखान्यावर छापेमारी करून तब्बल 2428 किलो 958 ग्रॅम वजनाचा एमडी साठा जप्त केला होता. प्रेमप्रकाशने ड्रग्जच्या पैशातून कोटय़वधीची मायाजाल जमविली होती. त्याची सात कोटी 46 लाख 51 हजार किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता गोठविणे तसेच जप्त करण्याचा आदेश सक्षम प्राधिकरणाकडून देण्यात आला होता. त्यानुसार वरळी युनिटने प्रेमप्रकाश याचे दहिसर येथील दोन कार्यालये, गुजरातच्या जीआयडीसीमधील पाच हजार स्क्वेअर फुटाचा एक प्लॉट, नालासोपारा येथील एक गाळा अशी दोन कोटी 56 लाख 39 हजार रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.