पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी ‘तो’ कुत्र्याला चावला… पण…

39

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

अमेरिकेत पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी एक आरोपी चक्क कुत्र्यालाच चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू हॅम्पशायर येथे एका व्यक्तीला जखमी करून तीन चोरटे पळण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांच्या कुत्र्याने तिसऱ्या चोराला शोधून काढले. यावेळी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराने कुत्र्याच्या डोक्याचाच चावा घेतला. त्यानंतर कुत्र्यानेही त्याच्यावर हल्ला केला व त्याला जखमी केले.

रविवारी बॉस्कोवॅन भागातील एका घरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर काही क्षणातच पोलीस घटनास्थळावर पोहचले. यावेळी घरामध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामागे चोरट्यांचे टोळके असावे असा पोलिसांचा अंदाज होता. पोलिसांनी लगेच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी घराशेजारील भिंतीवरून तीन चोर पळत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांच्यामागे आपले श्वान सोडले.

याचदरम्यान तिघांपैकी एका चोराला भिंतीपलिकडे उडी मारणे जमले नाही व तो कपड्यांच्या एका ढिगाऱ्याखाली जाऊन लपला. तोपर्यंत चोरांचा शोध घेत पोलीस व त्यांचे श्वानही तेथे पोहचले. यावेळी कपड्यांच्या खाली लपलेला चोर एका कुत्र्याच्या नजरेस पडला. त्याला बघताच कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. यामुळे पोलीसही सावध झाले. पोलिसांनी चोरावर झडप घालताच चोराने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा समोर आल्याने त्याने त्याचा गळा पकडला व त्याच्या डोक्याचा चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बिथरलेल्या कुत्र्यानेही चोरावर हल्ला करत त्याला जखमी केले. दरम्यान चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या