माशी मारण्याच्या नादात आजोबांनी घरात स्फोट केला, आजोबांचं काय झालं माहिती आहे ?

एका माशीमुळे आजोबांनी त्यांच्या घराचं मोठं नुकसान केलं आहे.  फ्रान्समधील पार्कोल भागातल्या चेनॉद डोरडोज या गावातली ही घटना आहे. या आजोबांचे वय 80 वर्षे असून रात्री जेवत असताना त्यांना ही माशी त्रास देत होती. मार्क (बदललेले नाव) हे जेवत असताना त्यांच्या प्लेटभोवती ही माशी घिरट्या मारत होती. यामुळे वैतागलेल्या मार्क यांनी ही माशी मारायचं ठरवलं. त्यांच्याकडे डास मारायची रॅकेट होती. या रॅकेटच्या सहाय्याने ते माशी मारण्याचा प्रयत्न करत होते.

maosquito-racket

मार्क हे माशी मारत असताना त्यांना माहिती नव्हतं की घरात गॅसगळती सुरू आहे. माशीला मारण्यात मार्क एवढे गुंग झाले होते की स्वयंपाकघरात गॅस पसरलाय हे त्यांना कळालंही नाही. मार्क यांच्या डास मारायच्या रॅकेटमधून एक स्पार्क निघाला आणि त्या ठिणगीने स्वयंपाकघरातील गॅसचा भडका उडाला. या भडक्यामुळे झालेल्या स्फोटात मार्क यांचं स्वयंपाकघर उध्वस्त झालं आहे. या स्फोटात त्यांच्या घराच्या छताचेही नुकसान झाले आहे. एवढं सगळं होऊनही ती माशी मेली अथवा नाही हे कळू शकलं नाही. सुदैवाने मार्क यांचा मात्र या दुर्घटनेत जीव वाचला आहे.

डासांचा किंवा माशांचा उपद्रव असणारं हिंदुस्थानातील एकही घर असं नसेल ज्या घरात डास मारण्याची रॅकेट दिसणार नाही. लॉन टेनिसच्या बॅटसारखी दिसणारी ही बॅट डास मारण्यासाठी वापरली जाते. यावरून अनेक जोकही तयार झाले. सीएसटी स्थानकाच्या सबवेमध्ये गेलात तर हिरव्या रंगाच्या झिरमिळ्यांवर फट..फट असा आवाज काढत ही रॅकेट विकणारे आपल्याला हमखास दिसतात. डास मारण्यासाठी बाजारामध्ये मच्छरदाण्या आहेत, स्प्रे आहेत, अंगाला लावण्याची क्रीम आहेत.

डास किंवा माशा पळवून लावण्यासाठी पूर्वी गुड नाईट सारख्या कंपनीच्या वड्या यायच्या. कालांतराने त्यांची जागा द्रव स्वरुपातील औषधांनी घेतली. बाजारात एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही डास मारण्यासाठीच्या रॅकेटवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाही. रस्त्यावर या रॅकेट विकल्या जातातच शिवाय आता त्या मॉलमध्ये, मेडिकलच्या दुकानातही मिळायला लागल्या आहेत. यातील बहुतांश रॅकेट या चीनमध्ये तयार होत असल्याचं त्या बारकाईने पाहिल्यास दिसून येतं. मात्र हा भन्नाट शोध लावला कोणी हे अनेकांना माहिती नाहीये.

या रॅकेटची खासियत अशी आहे की ही रिचार्ज करता येते. रिचार्ज झाल्यानंतर ती हातात घेऊन हवी तशी फिरवता येते. अनेकदा डास, माशा मारण्यासाठीचे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटचा आणि हमखास उपाय म्हणून ही रॅकेट बाहेर काढली जाते. एकटा हिंदुस्थानच नाही तर अनेक देशांमध्ये ही रॅकेट वापरण्यात येते. आशियाई खंडातील देशांमध्ये डासांचे आणि माशांचे प्रमाण अधिक आढळते. दमट, पाणथळ जागी डास हमखास आढळतात. अशा ठिकाणी डासांमुळे होणारे आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे. साहजिकच आहे अशा देशांमध्ये डास मारण्यासाठीची औषधे किंवा उत्पादने यांना बरीच मागणी असते. यामुळेच ही रॅकेट अनेक देशांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

ही रॅकेट कोणी शोधली याचा आम्ही बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती शोधत असताना आम्हाला ‘त्साओ आय शिह’ नावाच्या व्यक्तीबद्दल पत्ता लागला. आज आपण जी रॅकेट बघतो ती बनवण्याचा आणि त्याचं पेटंट आपल्या नावे करण्यात त्साओला यश आलं होतं. हुबेहुब टेनिस रॅकेट सारखी दिसणारी रॅकेट त्याने तयार केली होती. त्साओने वापरायला अत्यंत सोपं होईल असं तंत्रज्ञान रॅकेटसाठी वापरलं होतं. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही रॅकेट 1996 साली तयार करण्यात आणि त्याचं पेटंट मिळवण्यात त्साओला यश आलं होतं. त्साओ हा तैवानमधील तैपेईचा रहिवासी असल्याचं कळालं आहे. त्याच्या नावे आणखीनही काही पेटंट आहेत. त्साओने तयार केलेल्या रॅकेटचे आधुनिक रुपडे आपल्याला सध्या पाहायला मिळते. या रॅकेटकडे नीट पाहिल्यास त्यात दोन जाळ्या असल्याचं पाहायला मिळतं. मोठी जाळी आणि त्याच्या आतमध्ये बारीक जाळी. या दोन जाळ्यांमुळे डास कितीही लहान असला तरी तो आरपार जाऊ शकत नाही. डास मोठ्या जाळीतून आतमध्ये जातो, मात्र तो छोट्या जाळीत हमखास अडकतोच. आतल्या जाळीशी त्याचा जेव्हा संपर्क होतो किंवा स्पर्श होतो तेव्हा विद्युत पुरवठा सुरू असल्याने सर्कीट पूर्ण होते आणि डास जळून मरतो. यावेळी छोटा स्पार्क झाल्याचा आवाजही होतो आणि स्पार्क उडाल्याचं डोळ्यांनाही दिसतं. डास मारण्यासाठी या रॅकेटमधून 500 ते 1500 व्होल्टसचे व्होल्टेज निर्माण होते. रॅकेटचा माणसांना शॉक लागून मोठी इजा होऊ नये म्हणून या रॅकेटमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि त्यात तीन जाळ्या बसवण्यात आल्या.

त्साओला ही रॅकेट तयार करण्याची प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली, डासांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून तो काम करत होता का याबाबत मात्र फारशी माहिती मिळालेली नाहीये. मात्र त्साओने 1996 सालापर्यंत डास किंवा माशा मारण्यासाठी जी जाळीदार चौकोनी आकाराची रॅकेट वापरली जात होती त्यात सुधारणा करून वापरण्यास अत्यंत सोपी बनवली. विशेष म्हणजे तिला वीजेवर चालणारी आणि रिचार्ज करता येण्याजोगी बनवली बोती. 1959 साली ‘थॉमस लायने’ नावाच्या संशोधकाने माशा किंवा डास मारण्यासाठी एक उपकरण बनवलं होतं. हे उपकरण तयार होण्याआधी डास किंवा माशा फटक्याने मारायला लागत होत्या. त्यासाठी हाताने फटका मारता येतील अशा रॅकेट तयार केल्या जात होत्या. ‘लायने’ने तयार केलेल्या उपकरणाचे वैशिष्ट्य हे होते की, डास किंवा माशी या उपकरणाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा खात्मा व्हायचा. त्याने बनवलेले उपकरण हे वीजेवर चालणारे होते. मात्र हे उपकरण बाजारात आले की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.

1900 साली फटक्याने माशा किंवा डास मारता येतील अशी रॅकेटसदृश्य बॅट बनवण्यात रॉबर्ट माँटगॉमरीला यश आलं होतं. कालांतराने त्याने या बॅटचे पेटंट जॉन बेनेट नावाच्या व्यावसायिकाला विकले होते. बेनेटने या उपकरणात काही बदल केले आणि ते वापरण्यास अधिक सोपं करून बाजारात आणलं होतं. या बॅटला वीज पुरवठा नव्हता. ही बॅट डास मारण्यापेक्षा माशा मारण्यासाठी जास्त उपयुक्त होती. फटका मारून माशा मारण्यासाठी हे उपकरण वापरलं जात होतं. डास मारणं या बॅटमुळे बरंच कठीण होतं. जर एखाद्याच्या हातावर किंवा गालावर डास बसला असेल आणि या उपकरणाने फटका मारला तर समोरच्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता जास्त होती.

माशा मारण्यासाठी ही बॅट एकदम उपयुक्त होती आणि लवचिकही होती. एखाद्या ठिकाणी माशी बसली की वरून फटॅकSSSकरून बॅट चापकवायची की माशी खलास व्हायची अशी या बॅटची रचना होती. या बॅटला एक लांब दांडी होती आणि वरच्या बाजूला जाळीदार चौकट होती. जाळी यासाठी वापरण्यात आली होती की त्यामुळे हवेचा अवरोध कमी व्हायचा आणी अचूकपणे नेम साधला जायचा. माँटगॉमरी याच्या याच मूळ बॅटचं आधुनिक रुपांतर आपल्याला सध्याची इलेक्ट्रॉनिक रॅकेट असल्याचं पाहायला मिळतं.

डास हे अगदी प्राचीन काळापासून आजारांचे आणि मृत्युचे मुख्य कारण ठरलेले आहेत. आजही डास चावल्याने आजारी पडून अविकसित देशातील नागरिकांचा आणि खासकरून बालकांचा मृत्यू होतो. डास हे मानवी शरीरात रोग निर्माण करणारे विषाणू वाहून नेतात आणि त्यांची लागण झाल्याने माणूस आजारी पडतो. डासांमुळे झिका, पितज्वर, डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या