
कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहा:कार उडाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून योग्य ते अंतर राखावे असा सल्ला देण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी काही महिने विमान सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली असली तरी सामाजिक अंतर राखूनच प्रवाशांसाठीची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमान सेवा पूर्वपदावर येत असली तरी बरेच प्रवासी हे भीतीने प्रवास करणं टाळतायत. कोरोनाची भीती असलेल्या एका दांपत्याने सुरक्षित विमान प्रवास व्हावा यासाठी अख्खं विमानच बुक केल्याची घटना घडली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे इंडोनेशियचे रहिवासी असलेल्या रिचर्ड मुलाझादी यांनी पत्नीसोबतचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी विमानातील सगळी तिकीटं विकत घेतली होती. रिचर्ड मुलाझादी यांनी विमानातून पत्नीसोबत प्रवास करत असतानाची विमानातील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रिचर्ड हे अत्यंत श्रीमंत व्यक्ती असून उंची राहणीमानासाठी ते प्रसिद्ध आहेत. इंडोनेशियातील मोठे व्यापारी असलेल्या रिचर्ड यांना बायकोसोबत जकार्ताहून बालीला जायचे होते. त्यासाठी त्यांनी अख्खे विमानच बुक केले होते.
रिचर्ड आणि त्यांची बायको शाल्विन चांग हे कोरोनाच्या उद्रेकामुळे धास्तावलेले आहेत. आपल्यासोबत इतर प्रवासी असतील तर त्यांच्यामुळे आपल्याला कोरोना होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती. यामुळे त्यांनी विमानाने जायचं असेल तर आत फक्त दोघेच जण बसलेले असतील याची खात्री करून घ्यायची असं ठरवलं होतं. विमानातून त्यांच्यासोबत इतरांनी प्रवास करू नये यासाठी त्यांनी विमानातील सगळी तिकीटं विकत घेतली होती. रिचर्ड म्हणाले की चार्टर विमानाच्या तुलनेत प्रवासी विमानातील सगळ्या तिकीटांची एकूण रक्कम ही कमी होती, यामुळे त्यांनी विमानानेच जायचे ठरवले होते.