जुगाड – आळस एवढा की बेडला लावली बॅटरी अन् चाकं; एकदा चार्ज केल्यावर 48 किलोमीटर धावणार

झोप कोणाला प्यारी नसते. पण काही असेही असतात जे जेव्हा संधी मिळेल तेव्हा झोपा काढतात. अशा आळसावलेल्या लोकांना आपण कधी बेडवरून खाली उतरू नये आणि बेडवर झोपलेल्या अवस्थेतच सर्वत्र फिरावे अशी अपेक्षा असते. त्यात जर अशी व्यक्ती जुगाडू असेल तर मग झालंच. तसेच पाहिले गेले तर जगात जुगाड करणाऱ्यांची काही कमतरता नाही, पण काही लोकं असा जुगाड करतात की त्याची बातमी होते.

असाच एक जुगाड चीनमधील एका व्यक्तीने केला आहे. चीनच्या युआन प्रांतामध्ये राहणाऱ्या झु जिआंगक्विआंग (Zhu Jianqiang) नावाच्या एका व्यक्तीने चक्क बेडला बॅटरी आणि चाकं जोडली आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झु जिआंगक्विआंग (Zhu Jianqiang) याने बेडला चाकं जोडले आहेत. बेडवर झोपून झु एखाद्या कारप्रमाणे तो चालवतो. या बेडवर त्याचे पाळीव कुत्रेही दिसत आहेत. या बेडवर झोपलेल्या अवस्थेतच ते आजूबाजूच्या भागामध्ये प्रवास करतात. या बेडला एक बॅटरी जोडलेली असून ती एकदा चार्ज केल्यावर 48 किलोमीटर प्रवास करता येतो.

बेडवर झोपलेल्या अवस्थेतच ते सर्वत्र प्रवास करतात आणि चक्क मासे पकडण्यासाठीही जातात. तसेच बागेमध्येही ते जातात. याबाबत माहिती देताना झु यांनी सांगितले की, लहानपणापासून त्यांना बेडवरून उठण्याचा त्रास होता. यामुळे ते शाळेतही उशिरा पोहोचत होते. आपल्यातील आळस पाहूनच त्यांनी हा बेड बनवला आहे.