ब्राम्हणगावात 30 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, पाच आरोपींना अटक

सामना प्रतिनिधी । सेलू

सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका 30 वर्षीय तरुणाच्या अंगावर 15 लिटर पेट्रोलची कॅन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. सतीश बरसाले (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथून 5 आरोपींना रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी न्यालायसमोर हजर केले असता सर्व आरोपींना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

उद्धव खोसे, दिगंबर खोसे, राजेभाऊ खोसे, दत्ता खोसे आणि जीवन खोसे (रा. ब्राह्मणगाव ता. सेलू) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. घटना घडल्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून ते सेलू तालुक्यातील देवगाव फाटा या ठिकाणी दडून बसले होते. दरम्यान या घटनेतील कारभारी खोसे हा आरोपी अटक करण्यात आला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार वाजता देवगाव फाटा येथे सापळा रचला आणि त्यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, रामोड,माधव लोकूलवार, आप्पा वराडे,रणजित आगळे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वादाचे पर्यावसन हत्येत
सेलू तालुक्यातील वालूर रस्त्यावरील ब्राम्हणगाव येथे शनिवारी सकाळी कॅनल कॅम्पजवळ खोसे आणि बरसाले कुंटुबीयात वाद झाला होता. घरासमोरील नाली काढणे आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद टोकाला गेला. यातूनच खोसे कुटुंबीयातील चार ते पाच जणांनी 30 वर्षीय सतीश बरसाले याला बेदम मारहाण केली. मारहाण करून ते थांबले नाही, तर एकाने पेट्रोलने भरलेली कॅन सतीश बरसाले यांच्या अंगावर ओतली आणि दुसNयाने त्यास लगेच पेटवून दिले. क्षर्णाधात या पेट्रोलने पेट घेतल्याने सतीश बरसालेचा अक्षरशः कोळसा झाला. मृत सतीश बरसाले यांच्या आई व पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता