20 वर्ष ढेकरच आली नाही, डॉक्टरांनी दूर केला विचित्र विकार

फोटो सौजन्य- BBC

ढेकर येणं म्हणजे जेवल्यानंतर तृप्ततेची पावती मिळणं असं समजलं जातं. सोडायुक्त पेय प्यायल्यानंतर भरपेट जेवल्यानंतर सर्वसाधारणपणे ढेकर येते. मात्र इंग्लंडमध्ये एक माणूस असा आहे जो 20 वर्ष ढेकरच देऊ शकला नव्हता. फिल ब्राऊन असं या माणसाचं नाव असून त्याला एक विचित्र विकार होता, जो त्याला डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यानंतर कळाला. डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केला असून फिल आता ढेकरयुक्त सामान्य आयुष्य जगू शकेल असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

बीबीसीने दिलेल्या बातमीत म्हटलंय की इंग्लंडच्या ग्रिम्सबी भागात राहणारा 35 वर्षांचा फिल ब्राऊन याला विचित्र विकार झाला होता. गेल्या 20 वर्षात त्याने एकदाही ढेकर दिली नव्हती. तरुणपणी फिल ढेकर देत होता, मात्र अचानक त्याला ढेकर येणं बंद झालं होतं. यामुळे आपल्याला बराच त्रास झाला होता असं फिलचं म्हणणं आहे. 20 वर्ष आपण ढेकर न देता काढली , मात्र यानंतर असह्य झाल्याने आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला असं त्याने सांगितलं आहे.

मित्रांसोबत दारू प्यायला गेल्यानंतर किंवा जेवायला गेल्यानंतर फिलला त्रास सहन करावा लागायचा. ढेकर येत नसल्याने फिलचं पोट फुगायचं ज्याचा त्याला त्रास व्हायचा. फिल जेव्हा डॉक्टरांकडे जायचा तेव्हा ते त्याला अॅसिडिटी किंवा अपचनावरील औषधे द्यायचे. एके दिवशी इंटरनेटवर शोधाशोध करत असताना फिलला त्याच्या समस्येचे कारण काय असावं याचा अंदाज लागला होता. सर्चिंग करत असताना त्याला कळालं की त्याला जी समस्या आहे ती पोटाची नसून गळ्याची असावी.

फिलने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं होतं. डॉक्टरांनी त्याची बारकाईन तपासणी केल्यावर फिलने वर्तवलेला अंदाज खरा निघाला. गळ्यातील स्नायू ताठर झाल्याने ढेकर देत असतेवेळी पोटातील गॅस बाहेर फेकला जाण्याची प्रक्रिया गळ्यातील स्नायूंमुळे बंद होते. हाच विकार फिलला झाला होता. डॉक्टरांनी फिलच्या गळ्यातील मांसपेशींना बोटॉक्सचे इंजेक्शन टोचले ज्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे. ढेकरयुक्त जीवन पुन्हा जगता येत असल्याने फिल आनंदी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या