नवरीच्या चॅटींगच्या सवयीमुळे लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मोडले लग्न

80

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात एका लग्नमंडपात लग्नाचे विधी सुरू होण्याच्या काही तास आधीच नवऱ्यामुलाने लग्नासाठी नकार दिल्याने खळबळ उडाली होती. नवरी सतत व्हॉट्सअॅपवर चॅट करत असते त्यामुळे नवऱ्याने लग्नासाठी नकार दिल्याचे समजते. याप्रकरणी नवरीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

सदर तरुणाचे नौगाव सादत गावातील एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ७ सप्टेंबरला त्यांचे लग्न होणार होते. नवरी मुलगी तयार होऊन मंडपात देखील आली होती. मात्र नवऱ्याकडील मंडळींनी नवरीच्या वडिलांना फोन करून लग्न मोडल्याचे कळविले. याप्रकरणी नवरीच्या वडीलांनी हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. नवऱ्याकडच्यांनी आमच्याकडे ६५ लाखांचा हुंडा मागितला होता. मात्र तो देण्यास आम्ही असमर्थ ठरल्याने त्यांनी लग्न मोडल्याचे सांगितले.

नवऱ्यामुलाने मात्र त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले असून नवरीच्या सतत मेसेज करण्याच्या सवयीमुळे त्याने लग्न मोडल्याचे सांगितले आहे. ‘ती सतत व्हॉट्सअॅपवर चॅट करत असायची. मला देखील तिचे बरेच मेसेज यायचे. लग्नाच्या दिवशी आमचे नातेवाईक आमच्या घरी आले त्यातील अनेकांनी मला माझ्या होणाऱ्या बायकोने त्यांना मेसेज केल्याचे सांगितले. त्यामुळे मी हे लग्न मोडले, असे नवऱ्यामुलाने पोलिसांना सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या