गोळीबार करून सराफाकडील 50 तोळ्यांचे दागिने लुटले, माण तालुक्यातील थरारक घटना

तलवार व बंदुकीच्या धाकाने सोने-चांदी व्यावसायिकाकडील 50 तोळे सोने, 40 किलो चांदी व रोख सात लाख रुपये लुटल्याची घटना रविवारी सायंकाळी माण तालुक्यातील मलवडी येथे घडली. या घटनेदरम्यान एका संशयिताने व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले. तरीही, त्याला दोघांनी पकडून ठेवले. या संशयिताला सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबारही केला. त्यानंतर तिघे दुचाकीवरून पळून गेले.

मलवडी बसस्थानक परिसरात श्रीकांत तुकाराम कदम यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळी दुकानातील 50 तोळे सोने, 40 किलो चांदी व रोख सात लाख रुपये असा ऐवज तीन पिशव्यांमध्ये भरून ते दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र व त्रिंबकराव काळे विद्यालयातील रस्त्याने जात असताना अचानक एकजण समोर आला. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजून तिघेजण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात दणका दिला. त्यामुळे श्रीकांतचा ताबा सुटून गाडी घसरली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या दुचाकींकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर व श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या-पुतण्यांनी मिळून या संशयिताला पकडून ठेवले. आपला साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच एक जण परत आला. त्याने बंदुकीतून तीन-चार गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयिताला पुढे केले. त्यामुळे त्याच्या पाठीला गोळी चाटून गेली.

ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळून गेले. या घटनेची माहिती दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पकडलेल्या चोरटय़ावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्रीच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपअधीक्षक गणेश केंद्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दहिवडी पोलिसांत गुह्याची नोंद झाली असून, उपनिरिक्षक सोनवणे तपास करीत आहेत.