20 कोटींसाठी भरधाव रेल्वेखाली पाय ठेवत तोडून घेतले, न्यायालयाने ठोठावला दंड

एका माणसाने भरधाव रेल्वेखाली स्वत:चे दोन्ही पाय ठेवत तोडून घेतले. हे जीवघेणं कृत्य त्याने का केलं याचा उलगडा झाला आहे. 2.4 दशलक्ष पाऊंडची ( 20 कोटी रुपये) विमा रक्कम मिळवण्यासाठी त्याने स्वत:चे पाय तोडून घेतल्याचं कळालं आहे. यामुळे पैसे मिळण्याऐवजी त्याला जबरी दंड भरावा लागणार आहे. हंगेरीतील निर्कसासझारी गावात ही घटना घडली असून या माणसाचं नाव सँडोर असल्याचं कळालं आहे. सँडॉरने स्वत:चे पाय तोडून घेतल्यानंतर त्याचे पाय गुडघ्यापासून खाली कापून टाकावे लागले असून तेव्हापासून तो व्हीलचेअरला खिळला आहे.

सात वर्षांपूर्वी सँडोरचे पाय कापले गेले होते. हे प्रकरण जेव्हा न्यायालयात पोहोचलं तेव्हा पोलिसांनी सँडोरच्या अपघाताबाबत काही प्रश्नचिन्हे निर्माण केली होती. अपघात ज्यावर्षी झाला त्या वर्षी सँडोरने अति जीवघेण्या संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी 14 विमा पॉलिसी घेतल्या होत्या. या पॉलिसी घेतल्यास बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळेल असं आश्वासन विमा सल्लागाराने दिल्याने आपण त्या घेतल्या होत्या असा युक्तिवाद सँडोरने केला होता. अपघातानंतर सँडोरच्या बायकोने विमा कंपन्यात धाव घेऊन विम्याची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. यावर विमा कंपन्यांनी सँडोरने हे सगळं कुभांड रचल्याचा संशय व्यक्त करत विम्याची रक्कम देण्यास नकार दिला होता.

या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. सँडोरने दावा केला होता की त्याने काचेच्या तुकड्यावर पाय दिला होता, ज्यामुळे तो तोल जाऊन रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्याचवेळी स्टेशनमधून ट्रेन निघाली होती जी त्याच्या पायावरून गेली. सँडोरचं म्हणणं न्यायालयाला पटलं नाही ज्यामुळे न्यायाधीशांनी 9 नोव्हेंबर रोजी आपला आदेश सुनावला. आदेशात सँडोरला तुरुंगवासाच्या शिक्षेसह 4 लाख 71 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे आपण निराश झालो असल्याचं सँडोरने म्हटलं आहे. काय कापले गेल्याने अपंग झाल्याने आणि न्यायालयातील लढ्यामुळे सँडोर कंगाल झाला आहे. विमा कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी सँडोरने आता स्वत:च कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. हे शिक्षण घेऊन मोठ्या कंपन्यांद्वारे लुबाडल्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांची मदत करण्याचा आपला मानस असल्याचं सँडोरने म्हटलं आहे.