मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

1398

मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील बळवली फाट्याजवळील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे एका मोटर सायकलला अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला. गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. मयत झालेला तरुण हा नवी मुंबई मधील आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई येथील दोन तरुण सकाळी मुंबई गोवा महामार्गावरून होंडा मोटार सायकलवरून नवी मुंबईकडे निघाले होते. मोटार सायकल बळवली फाट्याजवळ हनुमान मंदिर ठिकाणी आली असता महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे मोटार सायकल चालकाचा तोल जाऊन दोन्ही तरुण खाली पडले. या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

अपघातानंतर पेण पोलीस घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त तरुणाचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या अपघातामुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या