अरे देवा! कोरोना बिरोना काय नसतंय म्हणणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला असून कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. हा विषाणू जीवघेणा असल्यामुळे तो संक्रमित होऊ नये यासाठी वेगवेगळ्या देशांनी विविध नियमावली जाहीर केल्या. यात हात धुणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे याचा समावेश होता. मात्र अनेक व्यक्ती ही नियमावली पाळताना दिसत नसून याचा तोटाही त्यांना सहन करावा लागतोय.

ब्रिटेनमधील एका व्यक्तीचा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने मृत्यू झाला आहे. गॅरी मॅथ्यू (वय – 46) असे या व्यक्तीचे नाव आहे. कोरोना नावाचा असा कोणताही विषाणू अस्तित्वात नाही, त्यामुळे मास्क घालू नका आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका असे आवाहन गॅरीने केले होते. मात्र आता त्याचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त ‘गार्डियन’ वृत्तपत्राने दिले आहे.

वृत्तानुसार, ब्रिटनमधील श्रोपशायर येथे राहणाऱ्या गॅरीने कोरोना नावाचा विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले होते. तो मास्कही लावत नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची तब्येत खालावली. जवळपास एक आठवडा तो आजारी होता आणि यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एका दिवसाच्या आतच त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबाचे स्पष्टीकरण

गॅरीला दम्याचा त्रास होता. त्यामुळे तो मास्क घालत नव्हता असे स्पष्टीकरण त्याच्या कुटुंबाने दिले आहे. मात्र गॅरी नेहमीच कोरोना नावाचा विषाणू नसल्याचे बोलत होता आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत होता. त्यामुळे गॅरीचा मृत्यू नक्की कोरोनामुळे झाला की त्याने आत्महत्या केली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ब्रिटनमध्ये 1 लाख बळी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. येथे विषाणूचा प्रकोप सुरुच असून सरकारने नियमही कडक केले आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. आता हा विषाणू जवळपास 70 देशांमध्ये पसरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या