माथेरानमध्ये घोड्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू, अश्वचालकावर गुन्हा

सैरावैरा पळणाऱ्या घोड्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माथेरानच्या हार्ट पॉईंटजवळ घडली. मोहम्मद शेख (२३) असे मृत तरुणाचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अश्वचालक जुबेर शेख याच्या विरोधात माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या मोहम्मदचे एक आठवड्यापूर्वी लग्न झाले होते. तो पत्नी आणि मित्रांसह २५ जानेवारीला माथेरानमध्ये पर्यटनासाठ आला होता. मोहम्मद हा हार्ट पॉईंट येथील एका घोड्यावर बसून फिरण्यासाठी निघाला. मात्र थोडे पुढे जाताच घोडा अचानक सैरावैर पळू लागला. यात तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी उल्हासनगरच्या लाईफ रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर मोहम्मदचा मृत्यू झाला. माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी याच अधिक तपास केला. तपासात अश्वचालक जुबेर शेख याच्य निष्काळजीपणामुळे पर्यटकाचा जीव गेला.