आई-वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन जाणार्‍या शिक्षकाचा मृत्यू, रेल्वेतून उतरताना पाय घसरून अपघात

प्रातिनिधिक

आई-वडिलांना हरिद्वारच्या यात्रेसाठी रेल्वेत बसवून देण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा रेल्वेतून उतरताना अचानक पाय अडकला. त्यामुळे घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास चाळीसगाव रेल्वेस्थानकावर घडली. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मूळचे माळशेवगे येथील योगेश गंभीरराव सूर्यवंशी (41, रा. विवेकानंद कॉलनी, बाप्पा पॉइंट, भडगाव रोड) हे माध्यमिक विद्यालय चिंचगव्हाण येथील शाळेत शिक्षक होते. शुक्रवारी सकाळी आई- वडिलांना हरिद्वार येथे जायचे असल्याने त्यांना रेल्वेत बसवून देण्यासाठी स्थानकावर गेले. आई वडिलांना पहाटेच्या दादर-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये बसवले. त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने योगेश पाटील हे घाईघाईने रेल्वेतून उतरत होते. यावेळी पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार प्लॅटफार्मवरील इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच सूर्यवंशी यांच्या मित्रांसह त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. मृत शिक्षक सूर्यवंशी यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.