पुणे – मुलीच्या अपहरणानंतर वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार देऊनही आरोपींचा शोध घेताना पोलिसांकडून दाद न मिळाल्याने मानसिक तणावातून मुलीच्या वडिलांनी धसका घेतल्याने त्यांचा ह्द्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.मुलीचा शोध लागेपर्यंत तिच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त नातेवाईकांनी नकार दिला.त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी 10 दिवसांच्या आत मुलीचा व आरोपीचा शोध लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मुलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.नीलेश देशपांडे (वय 45,रा.नारायण पेठ) असे निधन झालेल्याचे नाव आहे.

नीलेश देशपांडे यांची मुलगी एप्रिल महिन्यात बेपत्ता झाली आहे.याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.मुलीच्या कुटुंबीयांनी संशयित आरोपीची माहिती पोलिसांना दिली होती.दरम्यान ,नीलेश देशपांडे सातत्याने पोलिसांकडे तपासाबाबत माहिती घेत होते.मात्र,सतत तणावात राहिल्याने देशपांडे यांचा ह्द्यविकारच्या झटक्याने मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या