पोलिसांनी मदत नाकारली, महिलेने जखमी पतीला स्कूटरवरून नेले रुग्णालयात

21

सामना ऑनलाईन । नागपूर

पोलिसांनी मदत नाकारल्यामुळे एका महिलेला रात्री अडीच वाजता तिच्या जखमी पतीला स्कूटरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. दुर्देवाने त्या जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे जरिपटका पोलिसांचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे.

हॉटेल व्यावसायिक महेश वारयानी (27) यांच्यावर त्यांचे नातेवाईक आकाश व दीपेश छाबडा यांनी 22 जूनच्या रात्री दोनच्या सुमारास चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महेश गंभीर जखमी झाले होते. महेश यांची पत्नी भाविशा यांनी त्यांना बाईकवर मागे बसवत जरिपटका पोलिसांकडे धाव घेतली. रात्रीच्या वेळी पोलिसांकडून तात्काळ मदत मिळेल या अपेक्षेने त्या तिथे गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी गाडी नसल्याचे कारण देत महेश यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. भाविशा जखमी पतीला घेऊन जात असल्याचे पाहून दोन तरुण त्यांच्या मदतीला पुढे आले व त्यांनी त्यांना रुग्णालयात सोडले. मात्र पोलिसांनी महेश व भाविशाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. जखमी महेशचा दोन दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी महेश यांचा भाऊ पंकज यांनी पोलिसांवर टीका केली आहे. ‘पोलिसांनी एका जखमी व्यक्तीला साधं रुग्णालयात पोहोचविण्यासाठी देखील माझ्या वहिनीला मदत केली नाही. त्यांचे हे वागणे धक्कादायक आहे.’, असे पंकज यांनी सांगितले. जरिपटका पोलिसांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आम्ही भाविशा यांना मदत करण्यास तयार होतो. मात्र पोलीस ठाण्याची गाडी गस्त घालण्यासाठी गेली होती. गाडी आल्यावर आपण रुग्णालयात जाऊ असे सांगितले. मात्र भाविशा यांना घाई होती व त्यांना वाट बघायची नव्हती. त्यामुळे त्या दुसऱ्यांची मदत घेऊन रुग्णालयात गेल्या. त्यानंतर गाडी येताच आम्ही त्यांच्या मागे देखील गेलो’, असे जरिपटका पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या