
गवत कापण्याच्या मशिनचं पातं उडून एका व्यक्तीचं गुप्तांग छाटलं गेलं. थायलंडमधली इसान भागातील नोंग बुआ लांफू इथे ही दुर्घटना घडली आहे. जंगली प्रदेशात गवत आणि झुडपं कापत असताना हा प्रकार घडला आहे. प्रदीतसीन चुयपाद (39 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
पोलीस स्टेशनला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चुयपाद अतिरक्तस्त्रावामुळे बेशुद्ध पडला होता. त्याच्या शरीराजवळ पोलिसांना गवत कापण्याचं मशिनही दिसलं. ते मशिन बारकाईने पाहिलं असता पोलिसांना कळालं की ते मशिन खरंतर धातू कापण्यासाठीचं होतं.
चुयपादचा मृत्यू नेमका कशाने झाला हे माहिती करण्यासाठी त्याची पँट काढली असता त्याचं गुप्तांग छाटलं गेल्याचं दिसून आलं. मशिनचं पातं अधिक धारदार असल्याने चुयपादचं गुप्तांग झटक्यात कापलं गेलं असावं असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.
चुयपाद याला गवत कापण्यासाठी कंत्राटी पद्धतीने बोलावण्यात आलं होतं. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तो त्याचा शेवटचा दिवस होता. या जंगली पट्ट्याची देखभाल करणाऱ्या वाएन विसेत्सकदा यांनी म्हटले की धातू कापायचे ब्लेड वापरल्याने गवत कापण्याचे काम लवकर होईल असे बहुधा चुयपादला वाटले असावे. यामुळे त्याने हे ब्लेड निवडले होते. वाएन याने चुयपादला वाचवण्यासाठी बराच प्रयत्न केला, मात्र त्याच्या मदतीला कोणी नसल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने तो काही करु शकला नाही.