महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीच्या एअर बॅग्ज न उघडल्याने मुलाचा मृत्यू झाला म्हणून कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे राहणाऱ्या राजेश मिश्रा यांच्यासोबत घडली आहे.
मिश्रा यांनी 2020मध्ये 17 लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व हा आपल्या मित्रांसोबत लखनौ ते कानपूर असा प्रवास करत होता. धुक्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याची गाडी दुभाजकाला आपटली आणि पलटली. या भीषण अपघातात अपूर्वचा जागीच मृत्यू झाला. राजेश यांच्या म्हणण्यानुसार, या दुर्घटनेनंतर ते ऑटो एजन्सीच गेले होते. अपूर्व याने सीटबेल्ट लावूनही गाडीच्या एअर बॅग्ज उघडल्या नाहीत. त्यामुळे अपूर्वचा मृत्यू झाला. त्यावर एजेन्सीने त्यांची भेट महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी करून दिली.
मात्र, राजेश यांच्या आरोपांनुसार एजन्सीच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. जेव्हा गाडीचं तांत्रिक परीक्षण करण्यात आलं, तेव्हा गाडीत एअरबॅग नसल्याचं आढळलं. याची तक्रार करूनही कुणी दाद न दिल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर आनंद महिंद्रा यांच्या समवेत 13 लोकांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.