
खूप मोठी आसामी असल्याचं भासवत गोव्यातील एक माणूस बंगळुरूतील हॉटेलमध्ये आला होता. त्याच्यासोबत त्याचे 5 अंगरक्षकही होते. या माणसाने हॉटेलमधली एक खोली भाड्याने घेतली आणि नंतर त्याने हॉटेललाही चुना लावला आणि भाड्याने घेतलेल्या अंगरक्षकांनाही. स्वप्नील नाईक असं या माणसाचं नाव असून तो मूळचा गोव्याचा रहिवासी असल्याचं कळालं आहे.
2 जानेवारी रोजी स्वप्नील त्याच्या अंगरक्षकांसह झायॉन हॉटेलमध्ये आला होता. गांधीनगर भागातील या हॉटेलमध्ये त्याने खोली भाड्याने घेतल्यानंतर 8 जानेवारीला त्याची बायकोही इथे राहायला आली होती. 9 जानेवारीला हे दोघे रामनगर भागात फिरण्यासाठी मिनीबस करून गेले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. हॉटेलवाल्यांना नंतर कळालं की हे नाईक जोडपं त्यांना चुना लावून पळून गेलं आहे.
नाईक याने मिनी बस ज्याच्याकडून भाड्याने घेतली होती, त्यालाही गंडवला आहे. याशिवाय सुरक्षेसाठी म्हणून 5 अंगरक्षक भाड्याने घेणाऱ्या कंपनीलाही त्याने फसवल्याचं चौकशीदरम्यान कळालं आहे. हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांत नाईकविरोधात तक्रार नोंदवली असून त्यात म्हटलंय की नाईक दांपत्याने 1,43,243 लाख रुपयांचं बिल केलं असून ते भरलेलंच नाहीये. उप्पारपेट पोलिसांत नाईक दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना नाईकबाबत काही ठोस माहिती मिळाली असून त्याला शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.