संकेतस्थळावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक तरुणींना लाखो रुपयांचा चुना

124

सामना प्रतिनिधी । मुंबर्ई

‘जीवनसाथी’ आणि ‘शादी डॉट कॉम’ या विवाह नोंदणी संकेतस्थळावर छाप पाडणारे प्रोफाईल बनवून तरुणींना फसविण्याऱ्या भामटयाला क्राइम ब्रँच युनिट ११ ने बेडय़ा ठोकल्या आहेत. ‘ट्राय’ या सरकारी संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या या भामटय़ाने जवळपास २५ तरुणींची फसवणूक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील पोलीस ठाण्यांत अशाप्रकारचे गुन्हे केल्याची नोंद आहे.

चारकोप येथे राहणाऱ्या सुशीला (३७, नाव बदललेले) या तरुणीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलची नोंदणी केली होती. तिला जानेवारी महिन्यात एका तरुणाकडून रिक्वेस्ट आली होती. सुशीलाला त्या तरुणाचा प्रोफाईल आवडल्याने तिने त्याचा प्रपोजल स्वीकारला. त्या तरुणाने सुशीलाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सुशीलाच्या प्रेडिट कार्डचा तिच्या संमतीशिवाय वापर करून पैसे लाटले. तसेच तिचा विनयभंग केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुशीलाने चारकोप पोलिसात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद घाग, आनंद रावराणे, रईस शेख, एपीआय शरद झिने, नितीन उत्तेकर, शेषराव शेळके आदींच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. आरोपी हा ठाण्यात राहणारा असून त्याचे खरे नाव कृष्णा देवकाते (३१) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ठाण्यातील कृष्णाच्या मुसक्या आवळल्या. त्याने तरुणींना ५० लाखांहून अधिक लुटल्याचे तपासात समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या