सोनं लपवण्यासाठी त्याने लढवली ही शक्कल पण…

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कस्टमपासून वाचण्यासाठी तस्कर नवनवीन शकला वापरत असतात.काहीजण आपल्या बॅगेत बदल करून त्यात सोने लपवून आणण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण चक्क बूट किंवा चपलांमध्ये सोने लपवतात. पण दिल्लीत एका तस्कराने चक्क पँटलाच सोन्याची चेन व शर्टाला सोन्याची बटणं लावून कस्टम अधिकाऱ्यांनाच चकवायचा प्रयत्न केला. पण अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी दुबईहून सोनं घेऊन आला होता.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीन येथील हॉलमध्ये तपासणीसाठी या प्रवाशाला कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं. यावेळी आपल्याकडे हातातील छोट्या बॅग व्यतिरिक्त इतर काहीही सामान नसल्याचं त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. पण नियमानुसार सामानाची तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्याला अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याची बॅग एक्स रे मशीनमध्ये टाकताच मशीनने संकेत दिले. यामुळे अधिकारी सावध झाले. बॅग उघडून त्यांनी त्यातली एकएक वस्तू तपासायला सुरुवात केली. मात्र त्यांना सोने आढळलेच नाही.

पण बॅगेच्या तळाला ठेवलेल्या एका पँटची चेन, व एका शर्टाची बटणं, सोन्याची असल्याचं पाहून अधिकारी चक्रावले. यावेळी बॅगेत एक छत्रीही अधिकाऱ्यांना आढळली. या छत्रीच्या काड्या सोन्याच्या होत्या, त्याचबरोबर बॅगेत एक माऊथ ऑर्गनही अधिकाऱ्यांना सापडले. पण ते साधे सुधे माऊथ ऑर्गन नसून त्यात सोन्याच्या प्लेट्स होत्या. बॅगेत एक पर्सही होती. या पर्सच्या चारही कडा सोन्याच्या असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. यासर्व सोन्याचे वजन ५०० ग्रॅम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या