कोमातून सात महिन्यानंतर बाहेर आला; पोलिसांनी केली अटक

suicide

पोलीस नेहमी कार्यतत्पर असतात. अशीच पोलिसांची कार्यतत्परता ऑस्ट्रेलियामध्ये दिसून आली आहे. ऑस्ट्रलियात एक 21 वर्षांचा तरुण सात महिन्यानंतर कोमातून बाहेर आला. तो शुद्धीवर येताच त्याला अटक करण्यासाठी त्याच्यासमोर पोलीस हजर असल्याचे त्याने पाहिले. या तरुणावर गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. तिची हत्या केल्यानंतर हा तरुण इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यानंतर गेले सात महिने तो कोमात होता. तो शुद्धीवर आल्यावर त्याला अटक करण्यासाठी त्याच्यासमोर पोलीस हजर होते.

या तरुणावर सात महिने उपचार केल्यावर तो शुद्धीत आला. याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी पोलीस रुग्णालयात दाखल झाले. दक्षिण सिडणीमध्ये राहणारा हा तरुण गेल्या वर्षी जून महिन्यात त्याच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्याला गंभीर जखमा झाल्याने तो कोमात गेला होता. त्याच्यावर सात महिन्यांपासून उपचार सुरू होते. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरात 19 वर्षांच्या एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. या तरुणीला मारहाण करून तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या हत्या या तरुणाने केल्याचा आरोप आहे.

तरुणीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या करण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती, की तो अनावधानाने खाली पडला होता, याची चौकशी करण्यात येणार आहे. चौथ्या मजल्यावरील कॉमन भागातून हा तरुण खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यावरून तो काहीतरी अॅडव्हेंचर करण्याचा प्रयत्नात होता किंवा त्याने आमहत्या करण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारली असावी, असे तपास अधिकारी डिटेक्टिव रॉबर्ट एलिसन यांनी सांगितले.

चौथ्या मजल्यावरून पडल्यानंतर हा तरुण सुदैवाने वाचला आहे. एवढ्या उंचावरून पडल्यावर सहसा कोणी वाचत नाही. तो आता कोमातून बाहेर आल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे, असे एलिसन यांनी सांगितले. हा तरुण आणि हत्या झालेली तरुणी चीनमधील असून गेल्या दोन वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात एकत्र राहत होते. ते शिक्षणासाठी व्हिसा घेऊन शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियात आले होते.

न्यायालयाने तरुणाला जामीन नाकारला असून त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहवे लागणार आहे. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून तिची हत्या कोणी आणि का केली असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच कोरोना निर्देशांमुळे त्यांना तरुणीचे अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचे एलिसन यांनी सांगितले. तिच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या